मुंबई उच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा या दोघांना ६० कोटी रुपये न्यायालयात जमा करा आणि मग परदेश वारी करा असं म्हणत परदेश वारी करण्यासाठी अट ठेवली आहे. बुधवारी उच्च न्यायालयाने सांगितलं की जर तुम्हाला दोघांना परदेशात जायचं असेल तर आधी ६० कोटी रुपये कोर्टात जमा करा. त्यानंतर तुमच्या संमतीच्या याचिकेवर आम्ही विचार करु.

उच्च न्यायालयाच्या पीठाने नेमकं काय म्हटलं आहे?

मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायाधीश गौतम अखंड यांच्या पीठाने बुधवारी सांगितलं की शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना सुट्टीसाठी परदेश वारीची संमती दिली जाऊ शकत नाही. कारण या दोघांवर फसवणुकीचा आरोप आहे. यावर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलाने सांगितलं की फुकेत या ठिकाणी त्यांना फक्त फिरायला जायचं नाही तर तिथे त्यांना काम करायचं आहे. तसंच त्यांनी चौकशीत सहकार्यही दिलं आहे. ज्यावर पीठाने असं स्पष्ट केलं की या दोघांनी सहकार्य केल्यानेच त्यांना अटक झालेली नाही. जर ६० कोटी रुपये या दोघांनी न्यायालयात जमा केले तर त्यांना फुकेतला जाण्याची संमती देण्याचा विचार आम्ही करु. या प्रकरणी पुढील सुनावणी १४ ऑक्टोबरला होणार आहे.

मागील आठवड्यात काय घडलं होतं?

६० कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास या महिन्याच्या सुरुवातीला नकार दिला होता. आता मात्र न्यायालयाने परदेश वारीची संमती हवी असेल तर आधी ६० कोटी रुपये जमा करा अशी अट ठेवली आहे. शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांना थायलंडमधील फुकेत येथे सहलीसाठी जाण्याची परवानगी मागितली होती. ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी सुरू असलेल्या या सेलिब्रिटी जोडप्याने परदेशात प्रवास करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध जारी केलेल्या लूक आउट सर्क्युलरला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र ही संमती कोर्टाने दिली नाही. आता आज संमती हवी असल्यास ६० कोटी रुपये जमा करा असं न्यायालयाने म्हटलं आहे.

Shilpa Shetty under EOW summon ₹60 crore Raj Kundra fraud case Bollywood scam Mumbai
६० कोटींच्या फसवणुकीत शिल्पा शेट्टी लाभार्थी ? (संग्रहित छायाचित्र)

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधातलं प्रकरण काय?

दीपक कोठारी या मुंबईतील व्यावसायिकाने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची भेट घेतली होती. राजेश आर्या नावाच्या माणसाने ही भेट घडवून आणली होती. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते. बेस्ट डील टीव्ही हे होम शॉपिंग आणि ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्म होता. तक्रारीनुसार शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी ७५ कोटींचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज १२ टक्के व्याजदरावर घेण्यात आलं होतं. या कर्जातून व्याज वाचावं म्हणून राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी या दोघांनी कंपनीत आपण ७५ कोटींची गुंतवणूक केली आहे असं दाखवलं. तक्रारदार दीपक कोठारी यांच्या तक्रारीनुसार दर महिन्याला कर्जाची रक्कम हप्त्यांच्या स्वरुपात परत करण्याचं आश्वासन शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांनीही दिलं होतं. मात्र या दोघांनीही हे आश्वासन पाळलं नाही असा आरोप दीपक कोठारींनी केला आहे. यानंतर आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.