Shilpa Shirodkar Talk’s About Mithun Chakraborty : शिल्पा शिरोडकर ९०च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री. तिने त्याकाळी लोकप्रिय अभिनेते मिथुन चक्रवर्तींसह चित्रपटांत काम केलेलं. अशातच अभिनेत्रीने नुकतच त्यांच्यासह काम करण्याचा अनुभव सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
शिल्पा शिरोडकर अलीकडे चर्चेत आली ते ‘बिग बॉस १८’मुळे. हल्ली ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. अशातच तिने नुकतीच ‘एनडीटीव्ही’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने अभिनेते मिथुन चक्रवर्तींबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिला ती मिथुन यांच्याबरोबर संपर्कात आहे का याबद्दल विचारण्यात आलेलं.
शिल्पा शिरोडकरने सांगितली मिथुन चक्रवर्तींबरोबरची खास आठवण
मिथुन चक्रवर्तींबद्दल शिल्पा म्हणाली, “आता मी त्यांच्या संपर्कात नाहीये. मला त्यांच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे, तो शेवटपर्यंत असेल. माझी त्यांच्याबरोबरची एक खास आठवण आहे. लग्नानंतर मी लंडनला स्थायिक झाले होते, तेव्हा दादा शूटिंगच्या निमित्ताने लंडनला आले होते. त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले की, मला तुझं घर बघायचं आहे.”
शिल्पा शिरोडकर पुढे म्हणाली, “रात्री ११ वाजता ते आले आणि त्यांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाबरोबर जेवण केलं. ही माझी त्यांच्याबरोबरची सर्वात खास आठवण आहे. ते सातत्याने माझ्याबद्दल विचारपूस करत होते, तेव्हा माझी मुलगी खूप लहान होती. दादा मला अनेक गोष्टी विचारत होते. मला एकटं वाटतंय का, मी दिवसभर काय करते, सर्व गोष्टींचं नियोजन कसं करते; खूप कमी लोक एवढं करतात.”
मिथुन चक्रवर्तींबद्दल शिल्पा पुढे म्हणाली, “मी खूप पूर्वी हे स्पष्ट केलं होतं आणि सगळ्यांना सांगितलेलं की, मी या इंडस्ट्रीत आहे याचं कारण मिथुन दादा आहेत. त्यांनी रमेश यांना ‘भ्रष्टाचार’साठी माझं नाव सुचवलेलं. त्यापूर्वी मला दोन मोठ्या चित्रपटांसाठी नकार मिळालेला. दादांनी रमेश यांना फोन करून सांगितलं की, एक नवीन मुलगी आहे तिला काम हव आहे. जर त्यावेळी त्यांनी ते केलं नसतं तर आज मी या इंडस्ट्रीत नसते, त्यामुळे मी अभिमानाने सांगितले की, त्यांच्यामुळे माझं करिअर घडलं आहे.”
दरम्यान, शिल्पा शिरोडकरने १९८९ साली मिथुन चक्रवर्ती यांच्यासह ‘भ्रष्टाचार’ चित्रपटात काम करत बॉलीवूडमध्ये पादर्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘पाप की कमी’, ‘त्रीनेत्रा’, ‘स्वर्ग याहा नर्क याहा’ आणि ‘जीवन की शतरंज’ या चित्रपटांत काम केलेलं.