Shilpa Shirodkar on Namrata And Mahesh Babu: अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ही ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. हम, मृत्युदंड अशा काही चित्रपटांत काम करीत अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. लग्नानंतर अभिनेत्रीने अभिनयातून ब्रेक घेतला.

अभिनेत्रीने पुन्हा अभिनय क्षेत्रात काम करायचे असल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. बिग बॉस १८ मध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. आता सध्या शिल्पा शिरोडकर तिने एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.

“नम्रता माझ्यापेक्षा दोन वर्षांनी…”

शिल्पा शिरोडकरने नुकतीच ‘झूम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने तिची बहीण नम्रता आणि तिचा पती महेश बाबू यांच्याबाबत वक्तव्य केले. ती म्हणाली, “नम्रता माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. पण, मी तिच्याआधी काम करायला सुरुवात केली. मी आधी लग्न केलं. मला तिच्याआधी बाळ झालं होतं. त्यामुळे सगळ्यांना वाटते की, ती माझ्यापेक्षा लहान आहे.

नम्रता माझ्यासाठी सर्व काही आहे. मला वाटतं की, माझं लग्न झाल्यानंतर आमच्यातील नातं खूप घट्ट झालं. माझ्या आई-वडिलांचं निधन झाल्यानंतर तिच्याबरोबरचं माझं नातं पूर्णत: बदललं. तिनं माझ्यावर आईसारखं प्रेम केलं. ती माझी खूप काळजी घेते. मला तर असं वाटतं की, ती तिच्या मुलांपेक्षाही माझी आणि माझ्या मुलीची जास्त काळजी करते.”

पुढे अभिनेत्री म्हणाली, “माझ्या आयुष्यात काहीही झालं तरी ती माझ्याबरोबर कायम असणार आहे, हे मला माहीत आहे. मला तिचा पाठिंबा आहे. ती आता माझी मैत्रीणही आहे. मी तिला सर्व काही सांगते.”

शिल्पा पुढे हसत म्हणाली, “तिच्याकडे प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो, ज्याचा कधी कधी त्रासही होतो. पण, आता तिच्याशी कसं वागायचं हे मला माहीत आहे. एखाद्या गोष्टीवर आमचं कधीही एकमत झालं नाही. अशा वेळी मी फक्त हसून तिच्याशी बोलते. मी तिचं आयुष्य आनंदानं भरलं आहे, असं मला वाटतं. कारण- मी खूप विनोद करीत असते. नम्रताची मुलगी सितारा माझ्यासारखीच आहे.”

“महेश जगातील सर्वोत्तम व्यक्तींपैकी एक”

याच मुलाखतीत शिल्पाने नम्रताचा पती महेश बाबूबद्दलही वक्तव्य केले. शिल्पा म्हणाली की भारतातील मोठा स्टार असूनही तो कधीही अहंकारानं वागत नाही. त्याचे पाय कायम जमिनीवर असतात. त्याला कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही. अभिनेत्री म्हणाली, “आम्ही खूप साधे लोक आहोत. मला माहीत असलेल्या लोकांमधील महेश जगातील सर्वोत्तम व्यक्तींपैकी एक आहे. तो त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो.”

माझ्या पतीनं तसेच नम्रताच्या पतीनं आमच्यासाठी खूप काही केलं आहे. आमच्या आई-वडिलांचे अचानक निधन झाल्यानंतर त्यांनी भावनिकरीत्या खूप पाठिंबा दिला आहे. महेशलादेखील खूप संकटांचा सामना करावा लागला आहे. कुटुंबाला गमावल्यानंतर त्यानं खूप दु:ख सहन केलं आहे. अशा काळात घरातील सदस्यांनी एकमेकांबरोबर असणं गरजेचं असतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस १८’ नंतर कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.