बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने रमेश सिप्पी यांच्या ‘भ्रष्टाचार’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात मिथून चक्रवर्ती प्रमुख भूमिकेत होते. त्यानंतर मिथून चक्रवर्ती आणि शिल्पा शिरोडकर यांनी ‘खुदा गवाह’, ‘हम’, ‘आँखे’ अशा अनेक चित्रपटांत काम केले.
शिल्पा शिरोडकर लोकप्रियतेच्या शिखरावर होता. त्यावेळी तिने प्रसिद्धीझोतापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. तिने अपरेश रणजीत यांच्याशी लग्न केले आणि त्या परदेशात स्थायिक झाल्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या या निर्णयाचा तिला अजिबात पश्चाताप नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
“मी छान आणि साध्या माणसाशी लग्न केले”
शिल्पा शिरोडकर यांनी नुकताच ‘पिंकविला’शी संवाद साधला. या मुलाखतीत ती म्हणाली, “अभिनयातून मी जो ब्रेक घेतला होता, त्याचा मला अजिबात पश्चाताप नाही. मला माझ्या व्यग्र दिनचर्येची आठवण येत असे. पण, मी इतक्या गोड, छान आणि साध्या माणसाशी लग्न केले. माझ्या आयुष्याची सुरुवात करणं माझ्यासाठी महत्त्वाचे होतं. दुर्दैवाने, मी भारत सोडला, त्यामुळे काम सुरू ठेवणे माझ्यासाठी कठीण होते. जर माझं लग्न भारतात झालं असतं तर मी शंभर टक्के काम करत राहिले असते.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय सोपा होता. जेव्हा निर्णय तुमचा असतो, तेव्हा गोष्टी सोप्या होतात. तो निर्णय घेण्याची निवड माझी होती. मला कधीच मुंबई सोडायची नव्हती. कारण- मी पालकांच्या खूप जवळ होते. पण, जेव्हा मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला भेटले, दीड दिवसात मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी होकार दिली. होकार देताना मला माहित होते की तो भारतात राहणार नाही. तो परदेशात पुढील शिक्षणासाठी जाणार होता. त्यामुळे मला भारत सोडावा लागणार होता, हे मला माहित होता. पण, मला त्याचा प्रामाणिकपणा आवडला. मी त्यावेळी इतका विचारही केला नाही की मी काय करत आहे. सगळं काही क्षणात घडलं होतं.”
शिल्पा शिरोडकरने तिच्या आणि तिच्या पतीच्या शिक्षणात मोठा फरक असल्याचे खुलासा केला. अभिनेत्री म्हणाली, “मी १० वी नापास आहे. माझा नवरा बँकर आहे. तो डबल एमएमबीए आहेत. त्याने खूप वाचले आहे. मी त्याच्याशी आणि त्याच्या सहकाऱ्यांशी त्याच्याबरोबर पाहिलेल्या जीवनाबद्दल बोलू शकते. त्याच्यासमोर मला कधीही माझे शिक्षण कमी आहे, याची मला जाणीव झाली नाही. माझ्या शिक्षणामुळे कधीही मला त्याने कमीपणा दाखवला नाही.”
लग्नानंतर चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या का? यावर अभिनेत्री म्हणाली की मी त्यावेळी काही फार मोठी अभिनेत्री नव्हते. इतकी लोकप्रिय नव्हते की लोकांना वाटेल की मी चित्रपटांत पुन्हा काम करावे,असे वाटेल. काही लोक असेही होते की माझ्या जाण्याने त्यांना आनंदच झाला. पुढे तिने हेही कबुल केले की परदेशात जाऊन राहिल्यामुळे तिच्या व्यक्तीमत्वाला आकार मिळाला. कारण- तिथे मुंबईतील तिचा मित्र परिवार नव्हता. ठरलेल्या बजेटमध्ये जीवन जगण्याची तिला सवय लागली.
दरम्यान, शिल्पा शिरोडकर बिग बॉस १८ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. खेळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात तिला घराबाहेर पडावे लागले.