बॉलीवूडच्या सध्या काही टॉपच्या अभिनेत्रींमध्ये अग्रक्रमी येणारी अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. आपल्या निरागस अभिनय आणि सौंदर्याने ही अभिनेत्री कायमच चर्चेत राहत असते. ‘स्त्री २’ या चित्रपटाच्या यशानंतर तिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत खूपच वाढ झाली आहे. तसंच यामुळे तिच्या मानधनात बरीच वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे ती आता खूप विचारपूर्वक चित्रपट निवडते. दरम्यान, तिने एकता कपूरच्या चित्रपटाची ऑफर नाकारल्याच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राही अनिल बर्वे दिग्दर्शित आणि एकता कपूर निर्मित थ्रिलर चित्रपटात श्रद्धाला कास्ट करण्यात आलं होतं. पण सोशल मीडियावर अशा बातम्या येत आहेत की, मानधनाच्या वादातून श्रद्धा हा चित्रपट सोडत आहे. वृत्तानुसार, श्रद्धाने चित्रपटाच्या नफ्यातील वाट्यासह १७ कोटी रुपये मागितल्याचं म्हटलं आहे. जे निर्मात्यांना जास्त वाटलं; ज्यामुळे मतभेद निर्माण झाले.
या बातमीवर आपले मौन सोडत ‘तुंबाड’ चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी या केवळ अफवा असल्याचे म्हटलं आहे. याबद्दल त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी श्रद्धा कपूर चित्रपटातून बाहेर पडण्याच्या वृत्तांवर थेट भाष्य केलं नसलं, तरी ‘अफवांवर विश्वास ठेवू नका’ असं आवाहन केलं आहे. या पोस्टमध्ये ते असं म्हणतात, “कृपया सध्या मीडियामध्ये पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्ही योग्य वेळी अधिकृत घोषणा करू. धन्यवाद.”
श्रद्धा कपूर चित्रपट सोडण्याच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे दिग्दर्शकाने म्हटले आहे. ‘बॉम्बे टाईम्स’शी बोलताना त्यांनी श्रद्धाच्या प्रश्नावर मोजक्या शब्दांत उत्तर दिलं. यावेळी ते असं म्हणाले की, “सध्या मी रक्त ब्रह्मांड या वेबसीरिजवर काम करत आहे.” दरम्यान, श्रद्धाने केलेल्या अधिकच्या मानधनाच्या मागणीमुळे चित्रपटाचे बजेट बिघडले आणि म्हणूनच निर्माते आता नवीन अभिनेत्रीच्या शोधात आहेत.
एकता कपूर आता काही इतर टॉप अभिनेत्रींशी बोलत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच या चित्रपटाला एक नवीन नायिका मिळणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता ही अभिनेत्री नक्की कोण असेल? याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.