This Actress Refuses To Work With Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. कलाकारही त्यांचे चाहते असून अनेकांची एकदा तरी बिग बींबरोबर स्क्रीन शेअर करता यावी, अशी इच्छा असते. पण, तुम्हाला माहीत आहे का की, बॉलीवूडमध्ये अशी एक अभिनेत्री होती जिला लेडी अमिताभ बच्चन म्हटलं जायचं.

बॉलीवूडसह दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आपल्या सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. श्रीदेवी यांनी आजवर अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारत त्यांच्या अभिनयशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांना ‘लेडी अमिताभ बच्चन’, असंही म्हटलं जायचं. पण, तुम्हाला माहीत आहे का की, श्रीदेवी यांनी मात्र बिग बींबरोबर काम करायला नकार दिला होता.

हो. ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार ‘नागीण’, ‘हिम्मतवाला’ व ‘चांदनी’ यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता. पण, श्रीदेवी व अमिताभ बच्चन यांच्यामध्ये कुठलेही वादविवाद नसताना त्यांनी बिग बींबरोबर काम करायला नकार का दिला असेल? जाणून घेऊयात…

श्रीदेवींनी ‘या’ कारणामुळे बिग बींबरोबर काम करायला दिलेला नकार

उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार श्रीदेवी यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर चित्रपटात काम करायला नकार दिला होता कारण – त्यांच्या मते, अमिताभ बच्चन यांचा दमदार अभिनय आणि त्यांचं कमालीचं प्रभावी व्यक्तिमत्त्व यांमुळे त्यांच्याबरोबर मुख्य नायिकेच्या भूमिकेत असणारी कोणतीही अभिनेत्री शोपिस बनून जाईल, असं त्यांना वाटायचं.

१९९२ मध्ये ‘खुदा गवाह’ या चित्रपटासाठी डिंपल कपाडिया यांना आधी विचारणा झाली होती. परंतु, मानधनाच्या मुद्द्यामुळे त्यांनी नकार दिल्यानंतर श्रीदेवी यांना यासाठी विचारणा झाली. पण, त्यांनीही नकार दिला. दुसरीकडे श्रीदेवी यांनी आपल्याबरोबर काम करायला नकार दिला हे माहीत असतानाही अमिताभ बच्चन यांनी मात्र त्यांना त्या फिरोज खान यांच्याबरोबर गाण्याचं शूटिंग करीत असताना गुलाबाच्या फुलांनी भरलेला ट्रक पाठवला होता. बिग बींच्या या कृतीनं श्रीदेवी यांचं मन जिंकलं होतं आणि पुढे त्यांनी ‘खुदा गवाह’ चित्रपटासाठी होकार दिला.

१७ कोटींचं बजेट असलेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि त्या वर्षातील तो सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला. ‘खुदा गवाह’व्यतिरिक्त श्रीदेवी व अमिताभ यांनी ‘इन्कलाब’, ‘आखरी रास्ता’ व ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटांतही स्क्रीन शेअर केली आहे.