१९९४ हे वर्ष भारतासाठी खूप खास होते. कारण त्या वर्षी ऐश्वर्या राय व सुश्मिता सेन या दोघी सौंदर्यवतींनी अनुक्रमे मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या होत्या. पण, या दोघींबरोबर आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री मिस इंडिया स्पर्धेत होती, याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.
सुश्मिता सेन १९९४ मध्ये मिस इंडिया ठरली होती, तर ऐश्वर्या पहिली उपविजेती ठरली होती आणि लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री श्वेता मेननही या स्पर्धेत सहभागी झाली होती. श्वेता आता असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट्सची (एएमएमए) पहिली महिला अध्यक्ष आहे. श्वेताने सांगितलं की स्पर्धेदरम्यान ऐश्वर्या राय तिची रूममेट होती.
श्वेता व ऐश्वर्या होत्या रूममेट
इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह साउथ २०२५ मध्ये श्वेता म्हणाली, “मिस इंडिया स्पर्धेत ऐश्वर्या राय माझी रूममेट होती. सुश्मिता सेन या स्पर्धेची विजेती ठरली होती.” फ्रान्सिस्का हार्ट तिसरी उपविजेती होती. नंतर श्वेताने मिस इंडिया एशिया पॅसिफिकमध्ये भाग घेतला होता आणि तिसरी उपविजेती ठरली होती. “मी मिस इंडिया एशिया पॅसिफिकमध्ये सहभागी झाले होते, पण कोणाच्याही पाठिंब्याशिवाय तिसरी उपविजेती ठरले होते. त्यावेळी आमच्यात जो उत्साह होता तो आता जवळपास प्रत्येक मुलीत आणि माझ्या मुलीमध्येही मला पाहायला मिळतोय. आता प्रत्येकजण मॉडेल आहे,” असं मत श्वेताने व्यक्त केलं.
१९९४ मध्ये, मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनलचा किताब पेरूची जेसिका व्हेनेसा गुइल्फो तापिया हिने जिंकला होता. तर मेक्सिकोची कार्ला कॉन्ट्रेरास एस्ट्राडा ही पहिली उपविजेती, तुर्कीची ओझलेम मेटे दुसरी उपविजेती, इस्रायलची नथाली कोहेन तिसरी उपविजेती आणि ताहितीची वैहेरे लेहारटेल चौथी उपविजेती होती, अशी माहिती या स्पर्धेच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.
मातृभूमीशी बोलताना श्वेता मेनन म्हणाली, “एके दिवशी मी शाळेतून परत आल्यावर माझ्या वडिलांनी मला सांगितलं की कोइम्बतूरहून मिस इंडिया स्पर्धेत भाग घेण्यासाठी एक पत्र आलं आहे. मी त्यांना न विचारता अर्ज केला होता, त्यामुळे ते थोडे नाराज होते; पण तरीही त्यांनी मला स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी दिली आणि माझ्याबरोबर कोइम्बतूरला आले होते. मी स्पर्धेत पहिली उपविजेती ठरले आणि माझे फोटो केरळमधील वर्तमानपत्रांमध्ये आले. पहिली उपविजेती म्हणून मी अंतिम फेरीत भाग घेण्यास पात्र होते, पण माझे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याने मी सहभागी होऊ शकले नाही.”
श्वेताने १९९१ मध्ये आलेल्या ‘अनस्वरम’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या सिनेमात मामूटी मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या ‘पृथ्वी’ या चित्रपटातून श्वेताने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यात सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी यांच्या भूमिका होत्या. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला श्वेताने ‘अशोका’, ‘८८ अँटॉप हिल’, ‘हंगामा’, ‘कॉर्पोरेट’ या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं.