बॉलीवूडमधील नेपोटिझमबद्दल अनेकदा बोललं जातं. बऱ्याचदा प्रसिद्ध कलाकारांच्या मुलांमुळे इतर कलाकारांना संधी मिळत नाही. त्यांना डावलून स्टार किडला महत्त्व दिलं जातं, यांसारख्या अनेक गोष्टी कायम ऐकायला मिळतात. अशातच नुकतंच छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईने याबाबत सांगितलं आहे.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ निगमच्या आई ‘आझाद’ चित्रपटातील सिद्धार्थच्या भूमिकेबद्दल बोलल्या आहेत. ‘इन्स्टंट बॉलीवूड’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिद्धार्थ निगमच्या आई विभा निगम म्हणाल्या, “‘आझाद’ चित्रपटाच्या मीटिंगसाठी मी स्वत: सिद्धार्थसह गेले होते. आम्हाला तेव्हा चित्रपटाची पूर्ण कथा सांगण्यात आली. चित्रपटाची कथा चांगली असल्याने सिद्धार्थ एका चांगल्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार, यामुळे मी खूप आनंदी होते. आम्ही एक वर्ष यासाठी वाट पाहिली होती.”
‘इन्स्टंट बॉलीवूड’शी संवाद साधताना विभा पुढे म्हणाल्या, चित्रपटासाठी एक वर्ष वाट पाहिल्यानंतर अचानक एक दिवस त्यांनी ‘आझाद’ चित्रपटाचे पोस्टर पाहिले, ज्यावर अमन देवगणचा (अजय देवगणचा पुतण्या) फोटो होता. त्या म्हणाल्या, “सिद्धार्थ मला चित्रपटाचं पोस्टर दाखवत म्हणाला, हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि हे हे कलाकार या चित्रपटात आहेत. तेव्हा समजलं की ‘आझाद’मध्ये अजय देवगणचा पुतण्या अमन व रवीना टंडनची मुलगी राशा झळकले होते. जेव्हा ही गोष्ट घडली, तेव्हा मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा इतकं वाईट वाटलं होतं. आई म्हणून या गोष्टींचा खूप त्रास होतो. पण, मग माझ्या लक्षात आलं की ते दोघेही स्टार किड आहेत.”
सिद्धार्थ घडलेल्या गोष्टीचा स्वीकार करत या चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा होती असं सांगत म्हणाला, “यासाठी आपण कोणालाही दोष देऊ शकत नाही. हे व्यावसायिक क्षेत्र असल्याने तुम्ही असं का केलं हे विचारण्यात काहीच अर्थ नाही. त्यांच्याकडेही त्यांची काही कारणं असू शकतात, त्यामुळे आम्ही विचार केला की झालं ते झालं, आता आपण हा विषय सोडून देऊ.”
‘आझाद’ चित्रपटातून अमन देवगण व राशा थडानी यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. १७ जानेवारी २०२५ ला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. परंतु, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही. पण, चित्रपटातील ‘उई अम्मा’ हे गाणं मात्र चांगलंच गाजलं होतं. यासाठी राशाचं अनेकांनी कौतुक केलं. ‘आझाद’मध्ये अमन व राशासह अजय देवगण,डायना पेंटीसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते.
दरम्यान, सिद्धार्थ निगमबद्दल बोलायचं झालं तर त्याने आजवर मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो ‘धूम ३’, ‘किसी का भाई किसी की जान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकला होता. यासह त्याने ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’, ‘महाकुंभ’, ‘अलादीन – नाम तो सुना होगा’ यांसारख्या प्रसिद्ध हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.