आपल्या सशक्त अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. आज स्मिता पाटील यांचा जन्मदिवस. आज आपल्यामध्ये त्या नसल्या तरी त्यांच्या अभिनयाच्या चर्चा कायम असल्याच्या पाहाला मिळतात. स्मिता या त्यांच्या गंभीर भूमिकांसाठी विशेष ओळखल्या जायच्या. पण वास्तविक आयुष्यात त्या अगदी वेगळ्याच होत्या. आपल्या कामामुळे जगभरात नाव कमावणाऱ्या स्मिता पाटील त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिल्या.
स्मिता यांनी अनेक सुपरहिट चित्रपट चित्रपटसृष्टीला दिले. स्मिता व राज बब्बर यांच्या अफेअरच्या चर्चा कोणापासूनच लपून राहिलेल्या नाही. ‘आज की आवाज’ चित्रपटातील त्यांची व अभिनेता राज बब्बर यांच्या भूमिकेची विशेष चर्चा रंगली. त्यानंतर स्मिता व राज बब्बर यांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी राज बब्बर विवाहीत असून त्यांना दोन मुले होती. म्हणून स्मिता यांच्या आईने त्यांच्या आणि राज यांच्या नात्याला नकार दिला होता.

स्मिता यांनी त्यावेळी कोणाचाही विचार न करता राज यांच्यासह लिव्हइनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. ८०च्या दशकात लिव्हइन रिलेशनमध्ये राहणं ही खूप कठिण गोष्ट होती. त्यानंतर स्मिता-राज यांनी लग्न केलं. लग्नानंतर स्मिता गरोदर राहिल्या आणि त्यांनी १३ डिसेंबर १९८६ रोजी मुलाला जन्म दिला.
आज त्यांचा मुलगा प्रतीक बब्बर बॉलिवूडच्या नावाजलेल्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. पण प्रतीकच्या जन्माच्या वेळी स्मिता यांना खूप त्रास झाला. डिलिव्हरीच्यावेळी त्यांची प्रकृती बिघडली. मुलाला जन्म दिल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच स्मिता यांनी वयाच्या ३१व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. संसार सुरु होताच राज बब्बर व स्मिता पाटील यांच्या प्रेमकहाणीचाही दुःखद शेवट झाला.