दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील व ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा अभिनेता प्रतीक बब्बर लवकरच दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. प्रतीक घटस्फोटानंतर दोन वर्षांनी त्याच्या गर्लफ्रेंडशी दुसरं लग्न करणार आहे. प्रतीकच्या गर्लफ्रेंडचं नाव प्रिया बॅनर्जी आहे.

३८ वर्षांचा प्रतीक आणि प्रियाने त्यांच्या लग्नासाठी वर्षातील सर्वात रोमँटिक दिवस निवडला आहे. हे कपल व्हॅलेंटाईन डेला म्हणजेच १४ फेब्रुवारीला लग्न करणार आहे. गेल्या वर्षी या जोडप्याने त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. आता १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रतीक आणि प्रिया साता जन्माचे सोबती होतील. ई टाइम्सच्या रिपोर्टनुसार, प्रतीकच्या वांद्रे येथील घरी या जोडप्याचे लग्न होईल. लग्नाचा सोहळा अत्यंत खासगी असेल, ज्यामध्ये दोघांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी होतील.

प्रतीक व प्रिया या दोघांनी २०२३ च्या व्हॅलेंटाइन डे ला इन्स्टाग्रामवर नातं अधिकृत केलं होतं. आता बरोबर दोन वर्षांनी ते त्याच दिवशी लग्नगाठ बांधणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

Prateik Babbar second marriage
प्रतीक बब्बर व त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जी (फोटो – इन्स्टाग्राम)

प्रतीक बब्बरचं हे दुसरं लग्न असेल. त्याचं पहिलं लग्न २०१९ मध्ये सान्या सागरशी झालं होतं, पण ते नातं फार काळ टिकलं नाही. त्यांनी २०२३ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यानंतर प्रतीकच्या आयुष्यात प्रिया आली. प्रिया व प्रतीक दोघेही सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत असतात.

प्रतीकने प्रियाचं केलेलं कौतुक

“मी खूप भाग्यवान आहे की प्रिया माझ्या आयुष्यात आली. माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत, पण माझ्या आयुष्यात अशी अद्भुत स्त्री आली, यासाठी मी आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं काम केलं असेल. माझा घटस्फोट झाला आणि प्रियानेही तिचा साखरपुडा मोडला होता. त्याच काळात २०२० मध्ये मेसेजवर आमचं बोलणं सुरू झालं. माझ्या घटस्फोटामुळे मी सुरुवातीला तिच्याशी बोलायला संकोच करत होतो; पण आता मात्र ती माझं घर आहे. मला तिचं वेड आहे,” असं प्रतीक प्रियाबाबत म्हणाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रतीक व प्रिया या दोघांनी अद्याप त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केलेली नाही. प्रतीकच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो ‘धूम धाम’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारीलाच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. यामध्ये यामी गौतम, प्रतीक गांधी, एजाज खान हे कलाकारही आहेत. तसेच प्रतीक सलमान खान व रश्मिका मंदाना यांच्या ‘सिकंदर’मध्येही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.