सोनाक्षी सिन्हा लवकरच निकिता रॉय’ या चित्रपटातून झळकणार आहे. येत्या २७ जूनला हा सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. सोनाक्षी यापूर्वी संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’मधून झळकली होती. त्यामधील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. आता अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपटातून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सोनाक्षीने यानिमित्ताने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमधून अभिनेत्रीने तिला आलेल्या भयावह अनुभवाबद्दल सांगितलं आहे. सोनाक्षीला तिच्या घरामध्ये हा अनुभव आल्याचं तिनं म्हटलं आहे. ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनाक्षीनं तिचा भूत वगैरे गोष्टींवर विश्वास नव्हता, असं म्हटलं आहे. ती म्हणाली, “माझा खरं तर अजिबातच या गोष्टीवर विश्वास नव्हता; पण एक दिवस माझ्या घरामध्ये खूप विचित्र गोष्ट घडली. तेव्हापासून मी याबाबत जरा घाबरून आहे. पण ती एक घटना घडल्यानंतर तसं काहीच पुन्हा घडलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, कदाचित ते स्वप्न असावं”.
अभिनेत्रीनं तिच्यासह घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर सांगितलं आहे. सोनाक्षी म्हणाली, “मी झोपले होते. आणि जवळपास ४ वाजले असावेत. मला माहीत नाही की, ते स्वप्न होतं की काय; पण मला अचानक असं वाटत होतं की, कोणी तरी मला जागं करण्याचा प्रयत्न करीत आहे. जसं की माझा मृत्यू झालाय. मी खूप घाबरले होते. तेव्हा मी अक्षरश: माझे डोळेसुद्धा उघडले नाहीत. कोणी आहे की नाही हेही पाहिलं नाही; पण मी खूप घाबरले होते आणि मला धक्का बसला होता”.
सोनाक्षी घडलेल्या गोष्टीमुळे इतकी घाबरली होती की, पुढचे काही दिवस ती याच विचारांमध्ये होती. सोनाक्षी याबाबत पुढे म्हणाली, “दुसऱ्या दिवशी मला घरी यायला उशीर झाला होता आणि आदल्या दिवशीच्या रात्री घडलेल्या गोष्टीमुळे मी आधीच घाबरलेले होते. म्हणून दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर मी खोलीत शिरताना मोठ्याने बोलत होते आणि म्हणत होते की, काल जे कोणी आलेलं त्यांनी आज पुन्हा येऊ नका. प्लीज, मी खूप घाबरली आहे. जर काही बोलायचं असेल, तर स्वप्नात येऊन बोला; पण असं समोर नको”.