Son of Sardaar 2 Movie : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. नुकताच तिचा ‘निकिता रॉय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामुळे अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. अशातच सोनाक्षीने नुकतंच तिच्या एका गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वलबद्दल वक्तव्य केलं आहे. सोनाक्षी अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटातून झळकली होती. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.
‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटानंतर आता याचा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अजय देवगणने १९ जून रोजी या चित्रपटाची घोषणा केली होती. ‘सन ऑफ सरदार २’ या आगामी चित्रपटात अजय देवगणसह अभिनेत्री मृणाल ठाकूर झळकणार आहे, त्यामुळे सोनाक्षी सिन्हा ‘सन ऑफ सरदार’च्या सिक्वलमध्ये पाहायला मिळणार नाही.
सोनाक्षीने आता या चित्रपटाबद्दल तिची प्रतिक्रिया दिली आहे. ‘आयएएनएस’शी संवाद साधताना सोनाक्षीने याबद्दल म्हटलं आहे. ती म्हणाली, “कथा कदाचित वेगळी असेल, पात्रांमध्ये बदल झाला असेल, त्यामुळे मला याबद्दल काहीच वाटत नाही.” या चित्रपटाबद्दल सोनाक्षी पुढे म्हणाली, “या इंडस्ट्रीत इतक्या वर्षांपासून काम करत असल्याने मला असं वाटतं की आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. ही खूप छोटी गोष्ट आहे. यामध्ये काहीही वावगं नाहीये आणि याचा मला काहीच फरक पडत नाही”.
सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेल्या २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अश्विनी धीर यांनी केलं होतं. यामध्ये सोनाक्षी व अजय यांच्यासह अभिनेत्री जुही चावला, संजय दत्त हे कलाकारही झळकले होते. अशातच आता या चित्रपटाचा पुढचा भाग ‘सन ऑफ सरदार २’ येत्या २५ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
‘सन ऑफ सरदार’मध्ये अजय देवगण व मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत असणार आहे. त्यांच्यासह या चित्रपटात रवी किशन व संजय मिश्रा हे कालाकारही झळकणार आहेत. मृणाल ठाकूर या चित्रपटातून पहिल्यांदाच अजय देवगणसह झळकणार आहे, त्यामुळे तिचे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.