Sonali Bendre Opens Up About Fear Of Cancer Relapse : सोनाली बेंद्रे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोनाली सध्या टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात झळकत आहे. अशातच तिने नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या कर्करोगाबद्दलच्या भीतीबद्दल सांगितलं आहे.

सोनालीने (RoboGynIndia 2025) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हा कार्यक्रम २-३ ऑगस्ट रोजी मुंबईच्या सांताक्रूझ परिसरातील ताज हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. “स्त्रीरोगशास्त्रातील रोबोटिक सर्जरी – या विषयावर चर्चा करण्यासाठी रोबोटिक स्त्रीरोग शस्त्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र आले होते. या परिषदेत आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीला चालना देताना रोबोटिक सर्जिकल तंत्रांमध्ये भारताच्या विस्तारत्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात सोनालीला तिच्या कर्करोगाच्या प्रवासाबद्दल तसेच तो शरीरात पुन्हा आढळण्याबद्दल विचारण्यात आलेलं. यावर सोनाली म्हणाली, “जेव्हा मला कर्करोगाचं निदान झालं होतं, तेव्हा याबद्दल फार बोललं जात नव्हतं. लोक याबद्दल (C) या शब्दाचा उल्लेख करून बोलायचे. मला पूर्वी हे जाणवलं नाही की कर्करोग इतका सामान्य झाला आहे. मी याबद्दल बोलल्यानंतर अनेकांनी माझ्याशी संपर्क केला आणि तेसुद्धा यातून जात असल्याचं सांगितलं.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “लोक याबद्दल फार बोलायचे नाहीत आणि हा त्रास सहन करायचे. कर्करोग झाला यात माझा दोष नाही, मग मी ते लपवून का ठेवायचं?” सोनाली पुढे म्हणाली, “जर तुम्ही आता पाहिलंत तर असं दिसतं की, पूर्वीप्रमाणे लोक आता याबद्दल बोलताना (C) शब्दाचा वापर करत नाही, तर जे आहे त्याच नावाने बोलतात.”

सोनाली बेंद्रेने व्यक्त केली भीती

कर्करोग पुन्हा शरीरात पसरण्याबद्दल सोनाली म्हणाली, “भीती अजूनही आहेच मी ते नाकारणार नाही, पण मी नियमितपणे स्कॅन करत असते. काळजी घेत असते. माझ्या बाबतीत असं झालेलं की, कर्करोग झालाय हेच मला फार उशिरा समजलं होतं. कर्करोगाच्या चौथ्या स्टेजला असताना मला याबाबत समजलं होतं, त्यामुळे तुम्ही चेकअप करत राहा. जर तुम्ही वेळीच त्यावर उपचार केले तर त्यातून लवकर बाहेर याल.”

दरम्यान, सोनाली बेंद्रे सध्या टेलीव्हिजनवरील कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. ‘कलर्स’ वाहिनीवरील ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमात ती झळकत आहे. अभिनेत्री या कार्यक्रमाचं होस्टिंग करत असून तिच्यासह मुनव्वर फारुकीसु्द्धा पाहायाला मिळत आहे. या कार्यक्रमात हिंदी टेलीव्हिजनवरील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलने सहभाग घेतला आहे