Sonu Nigam on why he quit acting: सोनू निगम आज लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. त्याने बॉलीवूड आणि मराठी चित्रपटांतील अनेक गाणी गायली आहेत. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, सोनू निगमने अभिनय क्षेत्रातही त्याचे नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला होता.
आता सोनू निगमने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने अभिनय क्षेत्र सोडण्याचा का निर्णय घेतला याबद्दल वक्तव्य केले. जानी दुश्मन आणि इतर काही चित्रपटांत काम करताना आलेल्या अनुभवानंतर सोनू निगमनं चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला.
जानी दुश्मन या चित्रपटात सनी देओल, अक्षय कुमार, अर्शद वारसी, मनीषा कोईराला, अरमान कोहली, सुनील शेट्टी, आफताब शिवदासानी, सोनू निगम हे कलाकार प्रमुख भूमिकांत होते. राजकुमार कोहली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मात्र, या चित्रपटाला फारसे यश मिळू शकले नाही. २००२ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
सोनू निगम काय म्हणाला?
सोनू निगम म्हणाला, “अरमान कोहली माझ्या भावासारखा आहे. तो खरंच माझी खूप काळजी घेतो. मी या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी होकार देताना विचार केला होता की, चित्रपटात मोठे कलाकार आहेत. त्यामुळे तो चालेल. या चित्रपटात सनी देओल, मनीषा कोईराला, सुनील शेट्टी आणि इतरही लोकप्रिय व मोठे कलाकार होते. त्यांचा अंदाज इतका कसा काय चुकू शकतो? मी अपेक्षाच केली नव्हती की, इतके लोक चुकीचे ठरतील. आमचा चित्रपट चालणार नाही, असे वाटले नव्हते; पण, दुर्दैवाने तसे झाले.”
याच मुलाखतीत सोनू निगमने आणखी एका चित्रपटाचा उल्लेख केला. काश आप हमारे होते या चित्रपटाद्वारे दिग्गज अभिनेते राज बब्बर यांची मुलगी जुही बब्बर बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार होती. त्या चित्रपटात काम केल्यानंतर सोनू निगमचा भ्रमनिरास झाला होता. सोनू निगम म्हणाला, “तो चित्रपटही तसाच होता. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले तरी त्याचा क्लायमॅक्स काय असणार, हे कोणाला माहीत नव्हते. कारण- ते सीनच लिहिले गेले नव्हते. शूटिंग सुरू झाल्यानंतर ते ठरवत होते की, क्लायमॅक्स काय असणार आहे? मी विचार करत होतो, हे कोण लोक आहेत? मला माहीत नाही की, ती कोणाची चूक होती; पण मला वाटते की, ते आमच्या नशिबात लिहिलेले होते.”
दरम्यान, सोनू निगमला गायन क्षेत्रात मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र, अभिनय क्षेत्रातील त्याचा अनुभव फारसा चांगला नव्हता. चित्रपटाची निवड चुकल्यामुळे त्याला अशा अनुभवांना सामोरे जावे लागले. मग त्या कारणामुळे त्याने अभिनय क्षेत्रात काम न करण्याचा निर्णय घेतला.