Sonu Sood takes big step for flood victims in Solapur: सोनू सूदने आजपर्यंत देशभरातील अनेकांना निस्वार्थपणे मदत केल्याचे पाहायला मिळाले आहे. करोनाच्या काळात अनेक कुटुंबांसमोर जेव्हा अन्नपाण्याचा प्रश्न होता, अनेक कामगार जेव्हा मुंबईत अडकले होते, तेव्हा सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला होता.
अभिनेत्याने त्या काळात स्वखर्चाने लाखो कामगारांना सुखरूप त्यांच्या घरी पोहचवले होते. गरजू लोकांना मदत केल्याने सामान्यांमध्ये अभिनेत्याची मोठी लोकप्रियता आहे. त्याच्या अभिनयाबरोबरच तो त्याच्या सामाजिक कार्यासाठीदेखील ओळखला जातो.
सोलापुरातील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदने उचलले मोठे पाऊल
आता सोनू सूद पुन्हा एकदा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. सोनू सूदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणाला, “नमस्कार, सोलापूरमध्ये सीना नदीमुळे जो पूर आला आहे, त्यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे, त्याबद्दल आमची टीम माहिती घेत आहे. गरजू कुटुंबांना आम्ही खाण्याचे, मेडिकल कीट्स पोहोचवण्याचे काम करत आहोत.
“आमची चॅरिटी फाउंडेशनची टीम आणि इतर लोक या कार्यात आमच्याबरोबर जोडले जात आहेत. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी विनंती करतो, या पुरामध्ये ज्या घरांचे, कुटुंबाचे नुकसान झाले आहे, त्याची पूर्ण माहिती घ्या. आपण त्यांना एकत्रित येऊन पुन्हा सामान्य जीवन जगण्यास मदत करूयात, धन्यवाद; आपण लवकरच सोलापुरामध्ये भेटूयात.”
सध्या सोनू सूद सोालापूरमध्ये गेला आहे. तेथील काही व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याच्या या कार्याचे चाहते कौतुक करताना दिसत आहेत. सोनू सूद कायमच गरजूंना मदत करत असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावरदेखील अनेकजण त्याच्याकडे मदत मागतात. सोनू अनेकांना त्याच्यापरीने मदत करतो.
सोनू सूदच्या कामाबाबत बोलायचे तर त्याने ‘फतेह’, ‘विक्रम राठोड’, ‘सिंबा’, ‘सिता’, ‘आर राजकुमार’ अशा अनेक चित्रपटांसाठी तो ओळखला जातो. त्याने खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.