Bollywood Actor on Legal Ordeal: अभिनेता सूरज पंचोली नुकताच केसरी वीर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात सुनील शेट्टीदेखील प्रमुख भूमिकेत दिसत आहे. मात्र, २३ मे २०२५ ला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात जरी चित्रपटाला अपयश येत असले तरीही या कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होताना दिसत आहे. सूरज पंचोलीचा हा दुसरा चित्रपट असून, सिनेमातील त्याच्या अभिनयाचे कौतुक होताना दिसत आहे. सूरजने ‘हीरो’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘केसरी वीर’ हा त्याचा दुसरा चित्रपट आहे.
२०१३ साली अभिनेत्री जिया खानने आत्महत्या करीत तिचे जीवन संपवले. त्यानंतर सूरज पंचोलीवर आरोप करण्यात आले होते. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २०२३ मध्ये पुराव्याअभावी सूरजची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, जियाच्या मृत्यूनंतर सूरज पंचोलीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले होते. जेव्हा जियाच्या मृत्यू झाला, त्यादरम्यान सूरज बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार होता. आता ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने यावर वक्तव्य केले आहे.
ते कठीण काळात माझ्या पाठीशी…
सूरज पंचोली म्हणाला, “या संकटामुळे माझे कुटुंब जवळ आले. पूर्वीपेक्षा आता माझ्या कुटुंबाबरोबरचे माझे नाते खूप चांगले आहे. आमच्या आयुष्यात असा एक काळ होता जेव्हा आम्ही एकमेकांशी नजरेला नजर देऊन बोलू शकत नव्हतो. कारण- आम्ही सगळेच खूप वेदना सहन करीत होतो. आता आम्ही एकमेकांशी उत्तम पद्धतीने संवाद साधू शकतो आणि भूतकाळावर हसू शकतो. जेव्हा एखाद्या कुटुंबावर असे एखादे संकट येते, तेव्हा कुटुंबतील व्यक्ती अधिक एकमेकांच्या जवळ येतात. त्याआधी आमच्यात इतकी जवळीक नव्हती.”
पुढे सूरज पंचोलीने वडिलांबरोबर असलेल्या तणावपूर्ण संबंधावरदेखील वक्तव्य केले. अभिनेता म्हणाला, “एक काळ असा होता की, माझे वडील आदित्य पंचोली व माझ्यात मतभेद होते. आमच्यात जवळीक नव्हती. पण, ते कठीण काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. काहीही झाले तरी ते त्यांच्या मुलांच्या पाठीशी कायम उभे राहतील, हे मला समजले.”
२०१३ मध्ये जिया खानने आत्महत्या करताना सहा पानांचे एक पत्र लिहिले होते. मात्र, त्यामध्ये सूरजच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. जियाच्या मृत्यूनंतर तिच्या आई व इतर नातेवाइकांनी सूरजवर आरोप केले होते. मात्र, सूरज व त्याच्या वडिलांनी हे आरोप नाकारले होते. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत सूरजच्या आईने जियाच्या आत्महत्या करण्याच्या खूप आधीच जिया व सूरजचे ब्रेकअप झाले होते, असे वक्तव्य केले होते.
या सगळ्याचा त्याच्यावर काय परिणाम झाला, यावर सूरज म्हणाला, “हे सगळं झाल्यानंतर मी फार बदललो नाही. मी तसाच आहे. मी त्यावेळीदेखील भावूक होतो, आताही आहे. माझ्यामध्ये फार काही बदल झालेले नाहीत. पण, मी खऱ्या आयुष्यात फार खोडकर आहे, जे मला ओळखतात त्यांना माझी विनोदबुद्धी माहीत आहे. “
“करिअर ही वेगळी गोष्ट आहे. पण, या आरोपांमुळे मी माझी विशी जगू शकलो नाही. ती वर्षे पुन्हा माझ्या आयुष्यात येणार नाहीत आणि मी ती जगू शकणार नाही. करिअरमध्ये मी चांगल्या गोष्टी करेन, याचा मला आत्मविश्वास आहे. पण, मी माझा वैयक्तिक काळ गमावला आहे. हेही तितकच खरं आहे की, यादम्यान मी कामही गमावलं आहे. मला चित्रपटात काम करण्यासाठी विचारणा होत होती. मात्र, त्यानंतर सगळं हातातून गेलं. माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललला.”
“आता मला चांगले काम मिळावे, अशी माझी अपेक्षा आहे. फक्त मोठे प्रोजेक्ट मिळावे, असा विचार मी करीत नाही. ते माझे ध्येय नाही. मी कायम म्हणतो की, मला अजय देवगणचे करिअर जसे आहे, तसे काम करायचे आहे. तो इतरांच्या स्पर्धेत नाही. तो स्वत:च्या गोष्टी करतो. त्याने जे स्वत:च्या करिअरसाठी केले, तसेच काही मलाही माझ्या करिअरमध्ये करायचे आहे.”
पुढे सूरज असेही म्हणाला की, मला स्वत:चा अभिमान वाटतो की, मी स्वत:साठी लढलो. मी करिअरचा असा मार्ग निवडला आहे की, जिथे लोक तुमच्याबाबत बोलत राहतील. पण, मी सगळ्यांना चुकीचं सिद्ध करेन. मला अभिमान वाटतो की, परिस्थितीपासून मी पळून गेलो नाही, त्याच्याशी लढलो. मी स्वत:ची काळजी घेतली. विश्वास ठेवला आणि या सगळ्यातून बाहेर पडलो.”
दरम्यान, ‘केसरी वीर’नंतर अभिनेता कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.