Sridevi Baahubali Controversy : भारतीय सिनेसृष्टीतील काही गाजलेल्या सिनेमांच्या यादीत येणारं नाव म्हणजे ‘बाहुबली.’ एस. एस. राजामौली दिग्दर्शित बाहुबलीचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. ‘बाहुबली’च्या यशाचा सर्वच कलाकारांना फायदा झाला.

‘बाहुबली’ सिनेमाच्या अभूतपूर्व यशाबरोबरच काही वादही उद्भवले. त्यातील एक प्रमुख वाद म्हणजे – दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी ‘बाहुबली’मध्ये शिवगामीची भूमिका नाकारल्याचा. तेव्हा अशी अफवा पसरली होती की, श्रीदेवींनी काही अटी घातल्या होत्या आणि त्या पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी भूमिका स्वीकारली नाही.

पण, आता श्रीदेवी यांचे पती व चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी श्रीदेवींनी भूमिका का नाकारली याबाबत पसरलेली सर्व माहिती खोटी असल्याचं सांगितलं असून निर्मात्यांनीच ही खोटी माहिती पसरवल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

बोनी कपूर यांनी ‘Game Changers’ या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, श्रीदेवींनी ‘बाहुबली’मध्ये काम न करण्याचं एकमेव कारण म्हणजे निर्माते तिला योग्य मानधन देण्यास तयार नव्हते. ते म्हणाले, “श्रीदेवीने ‘बाहुबली’मध्ये काम केलं नाही, कारण निर्माते तिला योग्य मानधन देऊ इच्छित नव्हते. राजामौली आमच्याकडे आले होते, त्यांनी सिनेमाबाबत चर्चा केली; पण जेव्हा ते गेले तेव्हा निर्मात्यांनी तिला ‘English Vinglish’पेक्षाही कमी मानधनाची ऑफर दिली.”

याबद्दल ते पुढे म्हणाले, “श्रीदेवी काही संघर्ष करणारी किंवा नवोदित अभिनेत्री नव्हती, तिच्यामुळे हिंदी आणि तमिळ प्रेक्षक दोघांनाही फायदा होणार होता. अशा परिस्थितीत मी का माझ्या पत्नीला कमी मानधनावर काम करायला सांगावं?” बोनी कपूर यांनी पुढे सांगितलं की, निर्माता शोबू यारलागड्डा यांनी श्रीदेवीच्या मानधनाबाबत राजामौलींना खोटी माहिती दिली होती.

याबाबत बोनी कपूर म्हणाले, “माझ्या मते, निर्मात्यांनी राजामौलींना खरं सांगितलंच नाही. त्यांनी राजामौलींना सांगितलं की, श्रीदेवीला हॉटेलमधला पूर्ण मजला हवा होता, तिला स्वतःचा मोठा पर्सनल स्टाफ हवा होता. प्रत्यक्षात आम्ही फक्त एवढंच म्हटलं होतं की, शूटिंगच्या तारखा या आमच्या मुलांच्या सुट्यांमध्ये असाव्यात. शोबू यारलागड्डा (निर्माता) यांनीच राजामौलींना चुकीची माहिती दिली. त्यांनी खोटं सांगितलं की श्रीदेवी अमुक-अमुक मागण्या करत आहे. मग राजामौलींनी एका मुलाखतीत त्या गोष्टी सांगितल्या. पण, त्या सगळ्या खोट्या होत्या. शोबूने कदाचित पैशांबाबत तडजोड नको म्हणून हे सगळं केलं.”

बोनी कपूर इन्स्टाग्राम पोस्ट

श्रीदेवीच्या कथित मागण्यांबाबतचा वाद हा त्या काळात ‘बाहुबली’ आणि तिच्या इतर चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरला होता. ABN तेलुगू या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राजामौलींनी म्हटलं होतं की, “श्रीदेवींनी संपूर्ण हॉटेलचा एक मजला, १० कोटी रुपये आणि १० विमान तिकिटांची मागणी केली होती.” यावर प्रतिक्रिया देताना श्रीदेवींनी एका तेलुगू चॅनेलवर आपली नाराजी व्यक्त केली.

याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण देत म्हटलेलं, “मी सिनेइंडस्ट्रीत जवळपास ५० वर्षांपासून आहे आणि ३०० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केलं आहे. जर मी खरंच अशा मागण्या केल्या असत्या, तर मी इतकं काही साध्य करू शकले असते का? अशा वागणुकीमुळे इंडस्ट्रीने मला केव्हाच बाहेरचा रस्ता दाखवला असता. पण, जेव्हा स्वतःविषयी अशा गोष्टी ऐकायला मिळतात, तेव्हा खूप वाईट वाटतं. निर्मात्यांनी राजामौलींना चुकीची माहिती दिली असावी किंवा कुठे तरी गैरसमज झाला असावा, पण अशा गोष्टी सार्वजनिकरित्या बोलणं योग्य नाही, असं मला वाटतं.”