सलमान खानच्या ‘टायगर ३’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातील ‘लेके प्रभु का नाम’ हे गाणे अखेर प्रदर्शित झाले आहे. अगदी याच्या टीझरपासूनच हे गाणे ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते व याची आतुरतेने वाट पाहत होते. या गाण्यात पुन्हा एकदा सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जबरदस्त केमिस्ट्री आणि एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळाला आहे. या गाण्यात तुम्हाला ‘माशाअल्लाह’ आणि ‘स्वॅग से करेंगे सबका स्वागत’ या दोन्ही गाण्यांची आठवण नक्कीच येईल.
सलमानचे चाहतेसुद्धा त्याच्या या दोन्ही गाण्यांची तुलना करताना दिसत आहेत. आता मात्र शाहरुखचे काही चाहते या गाण्याला चांगलंच ट्रोल करू लागल्याचं दिसत आहे. या ट्रोलिंगला निमित्त ठरलं आहे कतरिना कैफने परिधान केलेला भगव्या रंगाचा ड्रेस. या ड्रेसमुळे कित्येकांनी सलमानला कॉपीकॅट म्हणून खिजवायला सुरू केलं आहे.
आणखी वाचा : भाईजानचा ‘स्वॅग’, कतरिनाचा ग्लॅमरस अंदाज; ‘टायगर ३’मधील ‘लेके प्रभू का नाम’ आले प्रेक्षकांच्या भेटीला
यावर्षी शाहरुखचा ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली याबरोबरच त्यातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यातसुद्धा अडकला. या गाण्यात दीपिकाला भगव्या रंगाची बिकिनी परिधान केलेली दाखवले असल्याने कित्येकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या अन् या चित्रपटाला जबरदस्त विरोध झाला. एवढा वाद निर्माण होऊनसुद्धा चित्रपटाने जगभरात १००० कोटींचा व्यवसाय केला.
हीच गोष्ट सलमान खान ‘टायगर ३’मधून करू पाहत असल्याचा काहींनी दावा केला आहे. ‘लेके प्रभू का नाम’ या ‘टायगर ३’च्या पहिल्याच गाण्यात कतरिना कैफला आपण एका बोल्ड आणि हॉट अशा भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये नाचताना पाहत आहोत. यामुळेच आता ‘पठाण’च्या पावलावर पाऊल ठेवून ‘टायगर’ चालतोय अशी टिप्पणी सोशल मीडियावर काही लोकांनी केली आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी तर बरेच मीम्ससुद्धा शेअर करायला सुरुवात केली आहे.
‘टायगर ३’चे पहिले गाणे आणखी एका कारणासाठी खास ठरले आहे. तब्बल १० वर्षांच्या वादानंतर अरिजितने सलमानसाठी प्रथमच गाणं म्हंटलं आहे.एका पुरस्कार सोहळ्यात सलमान आणि अरिजितमध्ये वाद झाला होता. यानंतर सलमान त्याच्यावर चांगलाच चिडला. सलमानने त्याच्या ‘सुलतान’ चित्रपटातील अरिजितचे गाणेही काढून टाकले होते. अरिजीतने सोशल मीडियावर माफीही मागितली होती, पण दोघांमधील गैरसमज दूर व्हायला इतकी वर्षं गेली.
‘टायगर ३’ १२ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सलमान खान व कतरिना कैफसह इम्रान हाशमी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट यश राज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिव्हर्स’चा हिस्सा असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे.