कॉमेडियन सुदेश लहरी यांनी अनेक रिअॅलिटी शो केले आहेत. त्यांनी सलमान खानच्या ‘रेडी’ चित्रपटातही काम केलं होतं. या चित्रपटातील भूमिका कशी मिळाली? सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? हे सुदेश यांनी सांगितलं आहे.

“रेडीच्या आधी मी बरेच पंजाबी चित्रपट केले होते. मी एक-दोन हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते. पण रेडी हा माझ्यासाठी पहिलाच बिग बजेट चित्रपट होता. या सिनेमाची ऑफर मिळाली तेव्हा माझे मुंबईत घर नव्हते. मी हॉटेलमध्ये राहायचो. एके दिवशी मला फोन आला की अनीस बज्मीने तुम्हाला बोलावलं आहे. मी भेटायला गेलो. आमचं बोलणं झालं, मग त्यांनी पुन्हा एकदा भेटायला बोलावलं. मी घाबरलो, मला वाटलं मी त्यांना आवडलो नाही आणि सिनेमा हातातून गेला,” असं सुदेश लहरी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

दुसऱ्या दिवशी, सुदेश लहरी थोडे संकोच करत अनीस बज्मींच्या ऑफिसमध्ये पोहोचले. सुदेश दुसऱ्या भेटीबद्दल सांगतात, “मी पोहोचताच त्यांनी सांगितलं की, चित्रपटात तुमचा एकही सीन नाही. मी ठरवलंय की संपूर्ण चित्रपटात तुमची भूमिका असेल.”

विमानाने केला प्रवास

सुदेश लहरींना चित्रपट मिळाला, पण आता आणखी एक अडचण आली. ते म्हणाले, “दिग्दर्शकाने मला सीन सांगितले. मी म्हणालो सर, कॉमेडी सर्कस मुंबईत सुरू आहे. तुमच्या चित्रपटाचे शूटिंग श्रीलंकेत सुरू आहे. मग त्यांनी विमानाने मला बिझनेस क्लासमध्ये शूटिंगसाठी पाठवलं.”

डायलॉग बोलायला घाबरत होते सुदेश लहरी

सुदेश लहरी यांनी सलमान खानबरोबरच्या सीनबद्दल सांगितलं. सुदेश चित्रपटातील डायलॉग बोलण्यास घाबरत होते. “रेडीमध्ये एक सीन आहे ज्यामध्ये मी सलमान सरांना म्हणतो- ‘अरे… मी तुझ्यासारख्यांना ड्रायव्हर ठेवतो.’ मला हे बोलायला भीती वाटत होती. हा डायलॉग कसा बोलावा हा विचार मी करत होते. मी बोलल्यावर सलमान नाराज झाल्यास काय होईल, असं मला वाटलं. मी अनीस बज्मी सरांना सांगितले की सर, तुम्ही सलमान खानला सांगा की असा माझा डायलॉग आहे, जेणेकरून मला आत्मविश्वास मिळेल. त्यांना डायलॉग आवडला नाही तर आधीच नकार देईल, किमान माझ्यावर चिडणार नाही. पण ते तयार झाले नाही, मग मी सलमान सरांकडे गेलो. मी म्हणालो ‘असा डायलॉग आहे’. ते म्हणाले ‘हो-हो आरामात बोला’. सलमान सरांनी माझा आत्मविश्वास इतका वाढवला की आम्ही तो सीन सहज शूट केला,” असं सुदेश लहरी म्हणाले.

सुदेश लहरी यांनी नंतर सलमान खानच्या ‘जय हो’ मध्येही काम केलं होतं. त्यांनी ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’, ‘द ड्रामा कंपनी’ आणि ‘कॉमेडी सर्कस के सुपरस्टार्स’ हे शो केले. ‘रेडी’ आणि ‘जय हो’ व्यतिरिक्त सुदेशने यांनी ‘नॉटी @ 40’ चित्रपटातही भूमिका साकारली होती.