७०-८० च्या दशकात आपल्या सुरेल आवाजाने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका व अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे ६ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून सुलक्षणा पंडित यांची प्रकृती खूप खालावली होती. त्यांना अनेकदा ओळखीचे लोकसुद्धा ओळखता येत नव्हते.
सुलक्षणा पंडित अनेक वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या. त्याबद्दल त्यांची बहीण विजयता पंडित यांनी एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत विजयता पंडित म्हणाल्या, “सुलक्षणादीदी माझ्यासाठी दुसऱ्या आईसारख्या होत्या. गेली १६ वर्षं त्या अंथरुणाला खिळून होत्या. कंबरेला झालेली दुखापत आणि अनेक शस्त्रक्रियांमुळे त्या अंथरुणाला खिळून होत्या.”
पुढे त्या म्हणाल्या, “मी आणि माझ्या कुटुंबानं त्यांची काळजी घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची सेवा केली. आम्ही केवळ घरातील एक सदस्यच गमावलेला नाही, तर त्या काळातील एक गुणी गायिका आणि अभिनेत्रीही गमावली आहे; ज्यांनी आपल्या काळातील मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम केलं होतं.”
सुलक्षणा पंडित यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेकदा चर्चा झाल्या. सुलक्षणा यांचं अभिनेते संजीव कुमार यांच्यावर प्रेम होतं. सुलक्षणा यांनी त्यांना लग्नासाठी विचारलं होतं. मात्र, संजीव कुमार यांनी नकार दिला होता. त्यानंतर सुलक्षणा यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे संजीव कुमार यांनीही लग्न केलं नाही. योगायोग असा की, सुलक्षणा पंडित यांचं निधन नेमकं त्या दिवशी झालं, ज्या दिवशी संजीव कुमार यांच्या निधनाला ४० वर्षं पूर्ण झाली आणि तो दिवस म्हणजे ६ नोव्हेंबर.
त्याबद्दल विजयता म्हणाल्या, “संजीव कुमार आणि आमच्या कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचं आणि दीदींचं नातं कधी विवाहात रूपांरित होऊ शकलं नाही. दोघेही आयुष्यभर अविवाहित राहिले. आणि मला असं वाटतं की, नशिबानं त्यांचं नातं पुन्हा एकदा एका वेगळ्या स्वरूपात जोडलं गेलं. कारण- दीदींचं निधनही त्याच दिवशी झालं, ज्या दिवशी संजीव कुमार यांचं निधन झालं होतं.”

सुलक्षणा पंडित यांच्याबद्दल थोडक्यात…
दरम्यान, सुलक्षणा पंडित यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास, त्यांनी बालगायिका म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी प्लेबॅक सिंगिंगमध्ये अनेक लोकप्रिय गाणी दिली आणि पुढे अभिनय क्षेत्रातही पाऊल ठेवलं. त्यांनी १९७५ साली संजीव कुमार यांच्याबरोबर ‘उलझन’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. नंतर त्यांनी ‘संकोच’, ‘हेराफेरी’, ‘अपनापन’, ‘खानदान’ व ‘वक्त की दीवार’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं.
