Why Popular director said Akshay has lost Credibility: अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. बॉलीवूडचा खिलाडी कुमार अशी त्याची ओळख आहे. हसवणाऱ्या, रडवणाऱ्या, विनोदी अशा अनेक भूमिका त्याने साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
बॉलीवूडच्या या लोकप्रिय अभिनेत्याच्या आयुष्यात एक काळ असाही आला की ज्यावेळी त्याला अपयशाचा मोठा सामना करावा लागला. मात्र, अलीकडील ‘स्काय फोर्स’, ‘हाऊसफुल ५’ या त्याच्या चित्रपटांना मोठी लोकप्रियता मिळाल्याचे पाहायला मिळाले. अक्षय कुमारने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात चित्रपट निर्माते सुनील दर्शन यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात काम केले. अक्षय कुमारच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे.
“त्यानंतर त्याचे सलग १३-१४ चित्रपट फ्लॉप…”
सुनील दर्शन यांनी नुकतीच विकी लालवानीला मुलाखत दिली. या मुलाखतीत, अक्षय करिअरच्या सुरुवातीला कसा अभिनेता होता? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “अक्षय जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आला तेव्हा तो खूप देखणा होता. त्याच्या करिअरच्या पहिल्या टप्प्यात त्याला लोकप्रियता मिळाली, त्याने चांगली प्रगती केली. त्यानंतर त्याचे सलग १३-१४ चित्रपट फ्लॉप ठरले.
पुढे सुनील दर्शन म्हणाले, “अक्षय मिथुन चक्रवर्ती यांच्यासारखा आहे. निर्माता कोण आहे हे न पाहता तो चित्रपटात काम करण्यासाठी होकार देतो. मला वाटते की त्याच्या करिअरच्या दुसऱ्या टप्प्यात त्याने विचार न करता एकापाठोपाठ एक चित्रपटात काम केल्याने त्याने विश्वासार्हता गमावली. चित्रपट निवडताना त्याने विवेकबुद्धीने विचार केला नाही.”
सुनील दर्शन असेही म्हणाले, “जरी अक्षय कुमारच्या अलीकडील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नसली, तरी अक्षयने वैयक्तिक पातळीवर चांगली कामगिरी केली आहे. फक्त तो प्रोजेक्ट निवडताना विचार करत नाही. ‘जानवर’ चित्रपटात अक्षयला कास्ट करण्याबद्दल सुनील दर्शन म्हणाले, “जानवर चित्रपटात मला अक्षय कुमारची खरोखर गरज नव्हती, कारण माझ्याकडे असे बरेच कलाकार होते, ज्यांच्याबरोबर काम करावे असे मला वाटत होते. पण, त्याला कास्ट करण्यामागे दोन कारणे होती. पहिले कारण म्हणजे तो खूपच देखणा आहे आणि दुसरे म्हणजे तो खूप शिस्तप्रिय आहे.
अक्षय त्याच्या ओळी विसरतो का? यावर सुनील दर्शन म्हणाले, “जर कलाकार त्याचे संवाद लक्षात ठेवत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण, मोठमोठे संवाद लक्षात ठेवणे अक्षय कुमारसाठी कठीण असते. पण, ही गोष्ट इंडस्ट्रीमध्ये सामान्य आहे. सुरुवातीच्या काळात अक्षयला संवाद लक्षात ठेवण्यासाठी फार त्रास होत नसे, कारण त्या दरम्यान तो कमी काम करत होता. मात्र, नंतर जेव्हा आम्ही एकत्र काम केले, त्यावेळी आम्ही त्याचे संवाद एका फलकावर लिहित असू. हे इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांबाबत होते.”
दरम्यान, आता अक्षय कुमार कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.