अभिनेते सुनील शेट्टी सध्या चर्चेत आहेत. त्याचे कारण म्हणजे ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट. या चित्रपटात परेश रावल यांनी काम करण्यास नकार दिल्यानंतर सुनील शेट्टी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली होती. “परेश रावलशिवाय ‘हेरा फेरी ३’ चित्रपट होऊ शकत नाही आणि त्यांचा हा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक आहे”, असं त्यांनी म्हटलं होतं. अशातच आता सुनील शेट्टी यांनी नुकतीच ‘लल्लनटॉप’ला मुलाखत दिली आहे.
‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या व्यावसायिक जीवनातील एक किस्सा सांगितला आहे. सुनील शेट्टी अभिनयासह त्यांचा स्वत:चा व्यावसायही करायचे. सुनील शेट्टी यांनी त्यांना पूर्वी धमक्यांचे फोन यायचे याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, “पूर्वी शेट्टी थोडे आक्रमक होते. कारण- तेव्हा मुंबईत खूप काही सुरू होतं. तेव्हा त्यांची एक वेगळी गँग होती आणि ते अंडरवर्ल्डच्या विरोधात आवाज उठवायचे. त्यात माझं नावही शेट्टी असल्याकारणाने त्यांना असं वाटायचं की, याला धमकावलं किंवा भीती दाखवली, तर बाकीचे शेट्टी घाबरतील आणि इतरांकडून पैसे वसूल करता येतील. ९० च्या काळात या सर्व गोष्टी सुरू असायच्या.”
सुनील शेट्टी यांनी याबाबत पुढे सांगितलं, “तेव्हा हेमंत पुजारी वगैरे लोक मला फोन करून धमकी देत असत. घरी, ऑफिसमध्ये, माझ्या मॅनेजरला फोन करून घाबरवलं जात असे. एक दिवस मला हेमंत पुजारीचा फोन आला आणि म्हणाला की, “तुझे वडील सकाळी ५ वाजता व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडतात तेव्हा मी त्यांना गोळी मारेन. तेव्हा मला राहवलं नाही आणि मी त्याला खूप शिव्या दिल्या. त्याला बोलण्याची संधीच दिली नाही. कारण- त्याला माझ्याबद्दल जेवढी माहिती होती त्यापेक्षा जास्त मला त्याच्या कुटुंबीयांबद्दल माहिती होती. पण मी त्याला ज्या शिव्या दिल्या, त्या सर्व त्यावेळी रेकॉर्ड झाल्या. त्या काळी माझ्याकडे सिक्युरिटी होती. तेव्हा मुंबई पोलिसांनी मला सांगितलं की, ते (हेमंत पुजारी आणि गँग) शुद्धीत नसतात कधी कधी, त्यांनी फक्त ऑर्डर देण्याचा विलंब असतो. पण, ती जर दिली, तर काहीही होऊ शकतं. त्यामुळे थोडं शांत राहा. हे पूर्ण प्रकरण जवळपास एक-दीड वर्ष सुरू होतं.”
दरम्यान, सुनील शेट्टी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. नायक, खलनायक, विनोदी अभिनेता अशा सर्व प्रकारच्या भूमिका त्यांनी चोखंदळपणे साकारल्या आहेत. तर सध्या ते ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत.