गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांचं वैवाहिक आयुष्य मागील काही महिन्यांपासून चर्चेत आहे. गोविंदाचं ३० वर्षांच्या मराठी अभिनेत्रीशी अफेअर आहे, असं स्वतः सुनीताने म्हटलं होतं. तिने घटस्फोटासाठी अर्जही केला होता. पण नंतर मात्र दोघेही परत एकत्र आले. आता सुनीताने गोविंदाच्या अफेअरबद्दल विचारल्यावर काय उत्तर दिलं, ते जाणून घेऊयात.

पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये सुनीता आहुजाने महिलांना पैसे कमवण्याचा आणि पतीवर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिला. सुनीता आता व्लॉगिंग करत आहे. “माझं खूप चांगलं चाललंय. व्लॉगिंग केल्यानंतर चार महिन्यांत मला युट्यूबचे सिल्व्हर बटण मिळाले. एका महिलेने स्वतःच्या पायावर उभे राहायला हवं. स्वतःचे पैसे कमवल्याचा आनंद वेगळाच असतो. तुमचा नवरा पैसे देतो, पण तो १० वेळा मागितल्यानंतर एकदाच देईल. तुमची स्वतःची कमाई तुमची असते,” असं ती म्हणाली.

सुनीता आहुजाने मागितलं घर

सुनीताने आता पती गोविंदाकडून मोठं घर मागितलंय. सुनीता मुलगी टीना आणि मुलगा यशसह ४ बेडरूमच्या घरात राहते. गोविंदा त्यांच्याबरोबर राहत नाही. “हे घर आमच्यासाठी लहान आहे. मी या पॉडकास्टमध्ये सांगू इच्छिते की ‘चिची, मला ५ बेडरूमचे मोठे घर घेऊन दे, नाहीतर बघ तुझं काय होतंय ते’,” असं सुनीता म्हणाली.

मराठी अभिनेत्रीबद्दल सुनीता आहुजा म्हणाली..

गोविंदाबरोबरच्या वैवाहिक आयुष्यातील अडचणी आणि अभिनेत्याच्या कथित अफेअर्सबद्दलच्या अफवांबद्दल विचारल्यावर सुनीता म्हणाली, “मी मीडियाला अनेकदा म्हटलंय की मी फक्त ते ऐकलं आहे. पण, जोपर्यंत मी त्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही किंवा रंगेहाथ पकडत नाही तोपर्यंत मी काहीही बोलू शकत नाही. मी ऐकलंय की ती एक मराठी अभिनेत्री आहे.”

अफेअर करण्याचं हे वय नाही

सुनीता पुढे म्हणाली, “हे सगळं करण्याचं वय नाहीये. गोविंदाने मुलगी आणि मुलगा यशच्या करिअरबद्दल विचार करायला हवा होता. पण, मी अफवा ऐकल्या आहेत. पण जोपर्यंत मी जाहीर करत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. मी मीडियालाही सांगितलं आहे की मी नेहमीच खरं बोलेन कारण मी खोटं बोलत नाही.”

सुनीता आहुजाचा भाचा कृष्णा अभिषेक व आरतीबरोबर वाद झाला होता, तो तिने संपवला आहे. “माझं आता कोणाशीही भांडण नाही, ती दोघेही माझीच मुलं आहेत. दोघेही खूप गोड आहेत. आता माझं भांडायचं वय राहिलेलं नाही. कृष्णाला मीच मोठं केलंय. मी आता सगळे वाद विसरलेय. मुलांनी आनंदी राहावं एवढीच माझी इच्छा आहे. आरतीने लवकर आई व्हावं, ती यशला राखी बांधण्यासाठी घरी येते.”

गोविंदा व सुनीता आहुजा यांनी १९८७ मध्ये लग्न केलं. या जोडप्याला मुलगी टीना आणि मुलगा यशवर्धन ही दोन अपत्ये आहे. यशवर्धन लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.