अभिनेता गोविंदा मागील काही महिन्यांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी सुनीता त्याच्या अफेअरचे आरोप करत असते. बरेचदा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चाही होतात. आता नुकतीच सुनीता आहुजाने ‘पती पत्नी और पंगा’ या शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये तिने सोनाली बेंद्रेचा उल्लेख करत पतीबद्दल वक्तव्य केलं.
सुनीता या शोमध्ये पाहुणी परीक्षक म्हणून आली होती. “‘पती पत्नी और पंगा’ मध्ये जाणं म्हणजे आठवणींमध्ये पुन्हा रमण्यासारखं होतं. मला पुन्हा गोविंदाच्या गाण्यांवर नाचायला मजा आली. सोनालीबरोबर स्टेज शेअर करणं आणि अनेक सुंदर जोडप्यांना खेळताना बघणं खूप छान वाटलं,” असं सुनीता म्हणाली. ईटाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
गोविंदा अभिनेत्रींबरोबर फ्लर्ट करायचा – सुनीता
सुनीता पुढे म्हणाली, “सोनालीबरोबर वेळ घालवणं खूप खास होते. आम्ही खूप हसलो आणि भूतकाळातील सर्व खास व मजेदार क्षणांची आठवण काढली. मी म्हणाले की गोविंदाने अनेक अभिनेत्रींबरोबर फ्लर्ट केले असेल, पण सोनालीबरोबर नाही. ती एकमेव अभिनेत्री होती जिच्याशी फ्लर्ट करण्याचा गोविंदाने प्रयत्न केला नाही.”
“खरं तर, गोविंदाने सोनालीला आग सिनेमात पहिला मोठा ब्रेक दिला. तो अनेकदा म्हणतो की मी लहान होते तेव्हा सोनालीसारखी दिसायचे. ते क्षण पुन्हा जगणं, काही गुपितं उलगडणं आणि माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग असलेल्या गोविंदाच्या स्टाइलने सर्वांचं मनोरंजन करणं खरोखरच खास होतं,” असं सुनीताने नमूद केलं.
काही दिवसांपूर्वी सुनीता व गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. चर्चा फेटाळू लावत एएनआयशी बोलताना सुनीता म्हणाली, “जर तसं काही असतं तर आम्ही इतके जवळ नसते. आमच्यात दुरावा असता. आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही, देव स्वतः आला तरी… माझा गोविंदा फक्त माझा आहे, दुसऱ्या कोणाचा नाही.”
दरम्यान, ‘पती पत्नी और पंगा’बद्दल बोलायचं झाल्यास हा शो सोनाली बेंद्रे व मुनव्वर फारुकी होस्ट करत आहेत. यात देबिना बॅनर्जी-गुरमीत चौधरी, हिना खान-रॉकी जैस्वाल, रुबिना दिलैक-अभिनव शुक्ला, अविका गौर-मिलिंद चंदवानी, स्वरा भास्कर-फहाद अहमद, गीता फोगट-पवन कुमार आणि सुदेश लेहरी-ममता लेहरी हे स्पर्धक आहेत.