अभिनेता विकी कौशलचा धाकटा भाऊ सनी कौशलदेखील बॉलिवूडमध्ये आपलं स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या तो त्याच्या मिली या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री जान्हवी कपूरबरोबर झळकताना दिसत आहे. पण या चित्रपटापेक्षा जास्त तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सनी कौशल हा सध्या मराठी अभिनेत्री शर्वरी वाघला डेट करत असल्याचे बोललं जात आहे. ते दोघेही रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चाही समोर येत आहेत. मात्र अद्याप त्या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण नुकत्याच एका मुलाखतीत सनी कौशलने याबद्दल आपले मौन सोडले आहे.

मिली या चित्रपटाच्या निमित्ताने सनी कौशलने नुकतंच ‘न्यूज १८ डॉट कॉम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला शर्वरी वाघला डेट करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही दोघंही अनेकदा कार्यक्रमात एकत्र दिसता, एकत्र डिनर पार्टीही करता, तू शर्वरीला डेट करतोस असेही बोललं जातं, हे सर्व खरंय का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने फार स्पष्टपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : “बाप मंत्रालयात आहे आणि पोरगी तमाशात…” मेघा घाडगेने सांगितला हृदयद्रावक प्रसंग

“जेव्हा माझे वैयक्तिक आयुष्य अशाप्रकारे हेडलाइनमध्ये येते तेव्हा मला काहीही फरक पडत नाही. माझ्या आणि शर्वरीत जे काही आहे त्याबद्दल अनेक चर्चा रंगत असतात. पण त्याचा आमच्या नात्यावर परिणाम होत नाही. आमच्या दोघांनाही चांगलं माहिती आहे की या केवळ बातम्या आहेत. पण त्याकडे जर सतत लक्ष दिले तर आम्हीच मूर्ख ठरु. त्यामुळे आम्ही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो”, असे तो म्हणाला.

त्यापुढे त्याने सांगितले की, “शर्वरी ही फार उच्च विचारांची मुलगी आहे. ती पडद्यावर आणि खऱ्या आयुष्यात फार वेगळी असते. ती चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींची काळजी घेते. आम्ही दोघेही चांगले मित्र आहोत. त्याशिवाय आमच्यात काहीही नाही.”

आणखी वाचा : “नातेसंबंध तोडण्यापूर्वी…” पतीच्या वाढदिवशी मानसी नाईकच्या पोस्टने वेधले लक्ष

यानंतर सनीला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. विकी कौशलच्या लग्नानंतर आता तुझ्यावर लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जातेय का? त्यावर तो म्हणाला, “मी माझ्या आई-वडिलांना या आधीच सांगितले आहे की, सध्या माझ्या लग्नाचा विचार करु नका. त्याकडे पाहू देखील नका. यासाठी माझ्याकडे अजून बराच वेळ आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सनी कौशल हा विकी कौशलचा लहान भाऊ असून त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर गोल्ड या चित्रपटाच्या माध्यमातून तो पहिल्यादाच रुपेरी पडद्यावर झळकला. तसंच तो काही वेबसीरिजमध्येही झळकला आहे. सध्या तो मिली या चित्रपटामुळे चर्चेत आहे.