Sunny Leone on why she opted for surrogacy: अभिनेत्री सोहा अली खानने एका आठवड्यापूर्वीच एका नवीन पॉडकास्टची सुरुवात केली आहे. ऑल अबाउट हिअर (All About Here (AAH) असे या पॉडकास्टचे नाव आहे. महिलांच्या आरोग्याबाबत, त्यांच्या प्रगतीबाबत तसेच त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, याबद्दल या पॉडकास्टमध्ये चर्चा केल्या जातात.
सोहा अली खानच्या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री मलायका अरोराने हजेरी लावली होती. आता नुकताच या पॉडकास्टच्या दुसऱ्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अभिनेत्री सनी लिओनीने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे.
सनी लिओनी म्हणाली…
सनीबरोबर डॉक्टर किरण कोएल्हो यांनीदेखील हजेरी लावली आहे. या मुलाखतीत अभिनेत्रीने पालकत्व, मुलीला दत्तक घेण्याबद्दल तसेच सरोगसीबद्दल वक्तव्य केले आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये सनी म्हणते, “मूल दत्तक घेण्याचा माझा विचार होता.” यावर डॉक्टर किरण म्हणाले, “भारतात, जर पत्नी गरोदर राहत नसेल तर दुसरे लग्न करतात, दुसरी पत्नी घरात आणतात.” सोहाने विचारले की, तुला मुलं दत्तक घेऊन सरोगसीद्वारे पालक व्हायचे होते की स्वत: मुलांना जन्म द्यायचा होता?
सनीने असाही खुलासा केला, “आम्ही मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. ज्या दिवशी आम्ही आयव्हीएफ(IVF) केले, त्याच दिवशी आम्हाला एक मुलगी दत्तकदेखील मिळाली.” तिचे बोलणे ऐकून सोहाला आश्चर्य वाटल्याचे दिसत आहे. यावर ती म्हणाली, ” म्हणजे एकाचवेळी तुम्ही तीन मुलांचे पालक झालात.”
याच मुलाखतीत सोहाने सनीला असेही विचारले की, सरोगसीचा निर्णय विचार करून घेतला होता का? यावर अभिनेत्री म्हणाली, “हो, आम्ही सरोगसीचा निर्णय विचार करून घेतला होता. आठवड्याला त्या महिलेला फी देत होतो. तिच्या पतीलादेखील पैसे मिळत होते, कारण त्याने कामावरून सुट्ट्या घेतल्या होत्या, त्यामुळे त्यांना त्याचे पैसे मिळत असत. आम्ही त्या महिलेला इतके पैसे दिले की तिने स्वत:चे छानसे घर विकत घेतले, तसेच तिला हवे होते तसे मोठे लग्नही केले.”
भारतातील सरोगसी आणि आयव्हीएफच्या कायदेशीर आणि वैद्यकीय पैलूंवरदेखील या पॉडकास्टमध्ये चर्चा होणार असल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
सनी लिओनी आणि डॅनियल वेबर यांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. २०१७ मध्ये या जोडप्याने त्यांची मुलगी निशा कौर वेबरला महाराष्ट्रातील लातूर येथून दत्तक घेतले. त्यावेळी निशा २१ महिन्यांची होती. निशाला दत्तक घेतल्यानंतर एका वर्षाने या जोडप्याला सरोगसीद्वारे जुळी मुले झाली. आशेर सिंग वेबर आणि नोआ सिंग वेबर अशी या मुलांची नावे आहेत.