सिनेसृष्टीत अनेक कलाकारांची भांडणं होतात आणि नंतर ते एकमेकांबरोबर काम करत नाहीत. मराठमोळे गायक सुरेश वाडकर यांचंही ऑस्कर विजेते ए.आर.रहमान यांच्यातही एक वाद झाला होता आणि नंतर त्यांनी कधीच एकत्र काम केलं नाही. ‘रंगीला’ चित्रपटातील संगीतकार ए.आर. रहमान यांचं ‘प्यार ये जाने कैसा ही’ हे गाणं प्रेक्षकांना खूप आवडले होतं. हे गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. हे गाणं सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलं होतं.
‘राजश्री अनप्लग्ड’ला दिलेल्या मुलाखतीत सुरेश वाडकर यांनी ए.आर. रहमान यांच्याबरोबरची पहिली भेट सांगितली. “तो तेव्हा तरुण मुलगा होता. तेव्हा मी त्याला दिलीप या नावाने ओळखत होतो आणि तो पाण्यासारखा सिंथेसायझर वाजवत असे,” असं वाडकर म्हणाले. १९९५ मध्ये ‘रंगीला’ चित्रपटाच्या रेकॉर्डिंगच्या वेळी सुरेश यांनी रहमान यांच्याबरोबर काम केलं होतं. त्यासाठी सुरेश यांना पूर्वीचे मद्रास म्हणजेच आताच्या चेन्नईमध्ये बोलावण्यात आलं होतं.
“एके दिवशी मला मद्रासहून फोन आला. ए.आर.रहमान हे नाव मी ऐकलं होतं, कारण ‘रोजा’ सिनेमा रिलीज झाला होता. ‘रोजा’ची सर्व गाणी मी मराठीत केली होती. ती गाणी डब करण्यात आली होती.” रहमान यांच्या काम करण्याच्या शैलीबद्दल वाडकर यांनी खुलासा केला. “दुपारपर्यंत झोपायचं ही त्याची दिनचर्या होती. त्याची सिस्टिम सेट होती. दुपारी २ ते पहाटे ३ किंवा ४ वाजेपर्यंत तो काम करत असे,” असं सुरेश म्हणाले.
“मी नेहमी चुकीच्या लोकांना डेट केलंय”, नीना गुप्ता यांचं वक्तव्य; म्हणाल्या, “खूप फालतू अन् वाईट…”
सुरेश पुढे म्हणाले, “तो आला तेव्हा मला आश्चर्य वाटलं. मी उत्साहात त्याला ‘दिलीप’ म्हटलं. पण गीतकार मेहबूबने मला सांगितलं की ते फक्त रहमान साहब आहेत. त्यामुळे दिलीप हा रहमान आहे, हे माझ्यासाठी थोडं धक्कादायक होतं. त्यानंतर त्यांनी मला ‘प्यार ये जाने कैसा है’ या गाण्याबद्दल सांगितलं. इतकं सुंदर गाणं त्याने बनवलं, याचा मला खूप आनंद झाला. मला खूप बरं वाटलं आणि आम्ही बराच वेळ बोलत राहिलो आणि लोकांनाही गाणं आवडलं.”
जेव्हा सुरेश यांनी पुढचं गाणं रेकॉर्ड करण्यासाठी चेन्नईला बोलावण्यात आले तेव्हा त्यांच्यात आणि रहमान यांच्यातील गोष्टी बिघडल्या. परिणामी या गायक-संगीतकार जोडीने कधीच एकत्र काम केले नाही. “त्यानंतर मी त्याच्यासाठी दुसरं गाणं करायला गेलो, पण त्यानंतर त्याने मला फोन केला नाही. कधी कधी कामाबद्दल तुम्हाला काही गोष्टी आवडतात तर काही आवडत नाहीत. मला त्याची सिस्टिम आवडली नाही. त्याच्या असिस्टंटने ते गाणं माझ्याबरोबर रेकॉर्ड केलं. तेवढ्यात सर (रहमान) आले. पण तोपर्यंत मी आणि साधना सरगम परत हॉटेलवर गेलो होतो,” अशी आठवण वाडकर यांनी सांगितली. यासंदर्भात ‘इंडियन एक्सप्रेस’ने वृत्त दिलंय.
सुरेश पुढे म्हणाले, “ए.आर. रहमान आला, त्याने गाणं ऐकलं आणि म्हणाला, ‘नाही नाही, मला हे गाणं थोडसं असं हवं आहे.’ या गोष्टी माझ्या सिस्टममध्ये व्यवस्थित बसत नाहीत आणि त्यामुळे आमच्यात थोडा वाद झाला. त्यानंतर ना त्याने मला कधी बोलावलं, ना मी कधी त्याच्यासाठी गाणं गायलं. त्या लहानशा वादानंतर परत कधीच एकत्र काम केलं नसलं तरी सुरेश वाडकर यांना एआर रहमान यांचं खूप कौतुक आहे. “तो एक अतिशय हुशार मुलगा आहे आणि उत्तम काम करतो. आम्हाला त्याच्याबद्दल खूप आदर आहे. ऑस्कर मिळवणारा तो भारतातील पहिला संगीतकार आहे, त्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो,” असं सुरेश वाडकर म्हणाले.