How Much Sushant Singh Rajput Spent On Rhea Chakraborty In Their Live-In-Relationship: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असताना त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीवर स्वतःच्या मर्जीने १६.८० लाख रुपये खर्च केले होते आणि हा खर्च निधीचा अपहार किंवा फसवणूक मानला जाऊ शकत नाही, असे सीबीआयने म्हटले आहे. सुशांतच्या मृत्यूच्या क्लोजर रिपोर्टमध्ये सीबीआयने ही माहिती उघड केली आहे.

सुशांत सिंह राजपूतने २०२० मध्ये आत्महत्या केली होती. तो एप्रिल २०१८ ते जून २०२० पर्यंत रियासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. सुशांतच्या विनंतीवरूनच त्याची मॅनेजर श्रुती मोदीने ऑक्टोबर २०१९ मध्ये या जोडप्यासाठी युरोप टूरसाठी तिकिटे बुक केली होती, असे सीबीआयने म्हटले आहे. दरम्यान, रियाने सुशांतचा मानसिक छळ केला आणि त्याच्या मालमत्तेतील १५ कोटी रुपयांचा गैरवापर केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला होता.

१४ जून २०२० रोजी ३४ वर्षीय सुशांत त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. या घटनेने मोठा वाद निर्माण झाला होता. नंतर सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी बिहार पोलीस करत होते, कारण सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे रियाने त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली होती.

सीबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे की, सुशांतने स्वतःच्या इच्छेने रियावर पैसे खर्च केले होते. कोणीही त्याचे पैसे जबरदस्तीने किंवा बेकायदेशीर पद्धतीने घेतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नात्यादरम्यान झालेला खर्च सामान्य खर्च मानला जातो, असे त्यात म्हटले आहे.

सीबीआयच्या अहवालात असेही म्हटले आहे की, ८ जून २०२० पासून सुशांतने आत्महत्या केली त्या दिवसापर्यंत रिया किंवा तिचा भाऊ शोविक त्याच्या घरी उपस्थित नव्हते. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रिया आणि शोविकला आरोपी करण्यात आले होते.

तपासात असे दिसून आले की, सुशांत १० जून रोजी व्हॉट्सअ‍ॅपवर शोविकशी बोलला होता, परंतु त्या दिवशी तो रियाशी बोलला नव्हता.

“८ जून रोजी रिया तिचा भाऊ शोविकसोबत सुशांतच्या फ्लॅटमधून बाहेर पडली तेव्हा तिने तिचा अ‍ॅपल लॅपटॉप आणि सुशांतने तिला भेट दिलेले अ‍ॅपल वॉच सोबत नेले होते. तपासात सुशांतच्या मालमत्तेतून त्याच्या नकळत कोणत्याही वस्तू चोरीला गेल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही”, असेही सीबीआयच्या अहवालात म्हटले आहे.