Seven Patriotic Films To Watch On Independence Day : देशभक्तीवर आधारित चित्रपट आणि गाण्यांचा आपल्याकडे मोठा चाहतावर्ग आहे. आजही ९०च्या काळातील देशभक्तीवर आधारित चित्रपट व गाणी अनेक जण पुन्हा पाहताना व ऐकताना दिसतात. अशातच भारत उद्या १५ ऑगस्टला आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. देशभक्ती आणि स्वातंत्र्याची भावना दर्शवणाऱ्या कथा पुन्हा एकदा आठवण्याची ही उत्तम संधी आहे. ते चित्रपट खालीलप्रमाणे.
‘स्वदेस’ (२००४)
आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित ‘स्वदेस’ हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. ज्यात शाहरुख खानने मोहन भार्गव ही भूमिका साकारली आहे. तो एक NRI असून नासाचा शास्त्रज्ञ असतो. स्वदेस ग्रामीण जीवन, सामाजिक जबाबदारी या विषयांवर भाष्य करतो आणि प्रेक्षकांच्या मनाशी खोलवर जोडतो. ए. आर. रहमानचे मन हेलावून टाकणारे संगीत यामध्ये पाहायला मिळते.
‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’ (२००२)
राजकुमार संतोषी दिग्दर्शित, भगत सिंग यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहायला हवा. ‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’ हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या योगदानाची कहाणी सांगतो. अजय देवगणने साकारलेली मुख्य भूमिका, तरुण क्रांतिकारकांचा ज्वलंत जोश, अन्याय आणि ब्रिटीश सत्तेविरोधातील त्यांचा संघर्ष या सगळ्याचे प्रभावी चित्रण या चित्रपटात आहे. या चित्रपटात सुशांत सिंग, राज बब्बर, फरीदा जलाल, डी. संतोष, अखिलेंद्र मिश्रा आणि अमृता राव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘रंग दे बसंती’ २००६
राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा हा चित्रपट भगत सिंह, राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांच्या संघर्षाची आठवण करून देतो. काही विद्यार्थी जेव्हा भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामावरील एका डॉक्युमेंटरीमध्ये अभिनय करतात, तेव्हा त्यांना सध्याच्या समाजातील भ्रष्टाचाराविरुद्ध उभं राहण्याची गरज जाणवते. आमिर खान, सिद्धार्थ, शर्मन जोशी आणि अतुल कुलकर्णी यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करतो.
‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’
“हाऊज द जोश?” हा संवाद सर्वत्र खूप गाजला होता. विकी कौशलने मेजर विहान शेरगिल ही भूमिका साकारलेली. हा चित्रपट उरी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात २०१६ मध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारित आहे. या चित्रपटात यामी गौतम, कीर्ती कुल्हारी, मोहित रैना आणि परेश रावल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘शेरशाह’
कर्नल विक्रम बत्रा यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास या चरित्रपटातून पाहायला मिळतो. कारगिल युद्धातील भारताच्या शूरवीरांपैकी एक असलेल्या विक्रम बत्रांची गोष्ट प्रेम, त्याग आणि शौर्याने भरलेली आहे. एक साधा मुलगा ते धाडसी आणि प्रेरणादायी सैन्याधिकारी असा त्यांचा प्रवास सिद्धार्थ मल्होत्राने अत्यंत प्रभावीपणे साकारला आहे. हा चित्रपट देशभक्ती, भावना आणि प्रेमाने भरलेला एक भावनिक प्रवास आहे, जो प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
‘सरदार उधम’
विकी कौशलचा सरदार उधम हा चित्रपट क्रांतिकारक सरदार उधम सिंग यांच्या जीवनावर प्रकाश टाकतो. जालियनवाला बाग हत्याकांडात झालेल्या हजारो निरपराधांच्या मृत्यूचा बदला सरदार उधम सिंग यांनी घेतला, त्यांनी त्या हत्याकांडास जबाबदार असलेल्या पंजाबचे तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर (Michael O’Dwyer) यांची हत्या केली. विकी कौशलचा प्रभावशाली अभिनय आणि चित्रपटाची कलात्मक मांडणी यामुळे हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा ठरतो.
‘केसरी’
१८९७ मध्ये २१ शीख सैनिकांनी १०,००० अफगाण आक्रमकांविरुद्ध दिलेला शौर्यपूर्ण लढा या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. सरागढीच्या लढाईवर आधारित या चित्रपटातील अक्षय कुमारच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलेलं. या चित्रपटातील कलाकारांच्या प्रभावी अभिनयाने आणि सुरेख गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.