ज्येष्ठ अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी(१८ नोव्हेंबर) रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तीन वर्षांच्या असल्यापासून त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्तरच्या दशकात दूरदर्शनवर गोड हसरा चेहरा आणि आपल्या मधाळ आवाजातील निवेदनाने ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ त्यांनी गाजवला होता. १९४७ साली तिसऱ्या वर्षी ‘नर्गिस’ चित्रपटातून त्यांनी अभिनयक्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं. या चित्रपटात नर्गिस व रेहमान मुख्य भूमिकेत होते. तबस्सूम यांनी चित्रपटात लहानपणीच्या नर्गिस यांची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘बैजू बावरा’ चित्रपटातही त्यांनी मीना कुमारी यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. चित्रपटसृष्टीत त्या बेबी तबस्सूम नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.

तब्बूसम यांनी ‘तला’, ‘हिर रांझा’,’गॅम्बलर’, ‘जानी मेरा नाम’, ‘तेरे मेरे सपने’, ‘सूरसंगम’, ‘अग्निपथ’, ’नाचे मयुरी’ अशा अनेक चित्रपटांत काम केलं आहे. १७७२ ते १९९३ या सलग २१ वर्ष चालणाऱ्या दूरदर्शन वाहिनीवरील ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ हा कार्यक्रम सूत्रसंचालन करुन त्यांनी गाजवला होता. बेबी तब्बूसम या तब्बूसम झाल्या पण त्यांच्या नावापुढचं बेबी तसंच राहिलं. तब्बूसम एखाद्या कार्यक्रमात गेल्यावर तिथेही त्यांची ओळख बेबी तबस्सुम अशीच करुन दिली जायची. लहानपणी तब्बूसम यांना आपलं नाव अ‍ॅण्ड बेबी तबस्सुम आहे, असं वाटायचं.

हेही वाचा >> “निधनानंतर दोन दिवस…” तबस्सूम यांच्या शेवटच्या इच्छेबाबत मुलाचा खुलासा

‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दलचा किस्सा सांगितला होता. “माझं इतकं वय झालं असलं तरी लोकांना मी आवडते. ‘बेबी तबस्सुम’ हे नाव आजही माझ्याशी जोडलं गेलं आहे. मी एखाद्या कार्यक्रमाला गेले आणि तिथे मला सन्मानचिन्ह मिळालं तर त्यावरही ‘सीनियर सिटिझन बेबी तबस्सुम’ असं लिहिलेलं असतं. मी मोठमोठय़ा कलाकारांबरोबर काम केलं आहे. त्यात माझं नाव सगळ्यात शेवटी यायचं. म्हणजे दिलीपकुमार, नर्गिस अ‍ॅण्ड बेबी तबस्सुम, मीनाकुमारी, अशोककुमार अ‍ॅण्ड बेबी तबस्सुम…तर तेव्हा लहानपणी मला वाटायचं की हे अ‍ॅण्ड हा माझ्या नावाचाच भाग आहे. त्यामुळे कुणी मला कधी विचारलं की बेटा तुझं नाव काय, तर मी सांगायचे की अ‍ॅण्ड बेबी तबस्सुम”, असं त्या म्हणाल्या होत्या.

तब्बसूम यांची संपूर्ण मुलाखत >> सध्याचे कॉमेडी शो अल्पजीवी!

तब्बसूम यांचं कलाक्षेत्रातील योगदान फार मोठं आहे. प्रकृती बिघडण्याच्या आधीही त्या एका कार्यक्रमाचं शूटिंग करत होत्या. काही भागांचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. उर्वरित भागांचे चित्रीकरण पुढच्या आठवड्यात करण्यात येणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tabassum passed away when actress thought and is part of her name know the reason behind it kak
First published on: 19-11-2022 at 21:30 IST