Tamannaah Bhatia on body positivity: हिंदी व तेलुगू चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक भूमिका साकारत अभिनेत्री तम्मना भाटियाने अभिनय क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. ‘स्त्री २’, ‘बाहुबली २: द कनक्लुजन’, ‘हमशकल’, ‘श्री’, ‘रेडी’ अशा अनेक चित्रपटांसाठी अभिनेत्री ओळखली जाते. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या डान्सचेदेखील मोठे कौतुक होताना दिसते.

तमन्ना भाटिया काय म्हणाली?

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिच्या करिअरमधील चढ-उतारांविषयी, प्रेक्षकांचा प्रतिसाद, तसेच तिच्या ‘आज की रात’ या गाण्याचा लहान मुले आणि त्यांच्या पालकांवर झालेला परिणाम यावर वक्तव्य केले आहे. तसेच, तिला एका महिला चाहतीने लठ्ठ म्हटल्याचा खुलासादेखील केला.

अभिनेत्रीने नुकतीच ‘लल्लनटॉप’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की, ज्यावेळी माझी ‘आज की रात’ आणि ‘कावाला’ ही गाणी प्रदर्शित झाली तेव्हा मी लठ्ठ असल्याचे लोकांनी म्हटले.

जेव्हा आज की रात हे गाणे प्रदर्शित झाले, तेव्हा बॉडी पॉझिटिव्हिटीला म्हणजेच शरीर आहे तसं स्वीकारण्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल माझे कौतुक झाले. ‘कावाला’ आणि आज की रात ही गाणी पाहिल्यानंतर प्रेक्षकांना वाटले की मी लठ्ठ आहे. पण, मला वाटते की तेव्हा मी बारीक होते.”

पुढे तमन्नाने एक किस्सा सांगितला. ती म्हणाली की, एका पार्टीत एक महिला माझ्याकडे आली. ती मला म्हणाली की, ‘आज की रात’ गाण्यानंतर तिच्यासारख्या लठ्ठ किंवा जाड महिलांना महत्त्व मिळत आहे किंवा ओळखले जात आहे, कारण मी त्या गाण्यात तशी दिसत होते. तिने लठ्ठ शब्द वापरला होता. तिचे बोलणे ऐकेपर्यंत मी जाड आहे असा विचार मी केला नव्हता, त्यामुळे लोक माझ्याबाबत काय विचार करतात, याचा एक दृष्टिकोन मिळाला.

पुढे तमन्नाने ‘आज की रात’ या गाण्याचा लहान मुलांवर कसा परिणाम झाला हेदेखील सांगितले. ती हसत म्हणाली, मला खूप महिलांचे फोन आले. त्यांनी मला सांगितले की ‘आज की रात’ गाणे ऐकल्याशिवाय आमची मुले जेवत नाहीत. पुढे ती असेही म्हणाली की, एक-दीड वर्षांच्या मुलांना गाण्याच्या ओळी समजणार नाहीत, पण मुलांना जेऊ घालणे हे त्यांच्या आयांसाठी महत्त्वाचे असते.

तमन्नाच्या आगामी कामाबद्दल बोलायचे तर ती लवकरच ‘व्हवान: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय पौराणिक कथांपासून हा चित्रपट प्रेरित आहे. २०२६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच अजय देवगण आणि संजय दत्त यांच्याबरोबर ती एका चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव काय आहे हे अद्याप उघड झाले नाही. याशिवाय ती एका वेब सीरिजमध्येदेखील दिसणार आहे.

दरम्यान, तमन्ना तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील अनेकदा चर्चेत असते.