Tamannaah Bhatia Recalls Working With Salman Khan And Shah Rukh Khan : तमान्ना भाटिया बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं तिच्या अभिनय व नृत्य यांच्या जोरावर अनेकांची मनं जिंकली आहेत. आता अभिनेत्रीनं नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिनं सलमान खान व शाहरुख खान या दोघांसह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
सलमान खान व शाहरुख खान ही बॉलीवूडमधील दोन मोठी नावं आहेत. दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. तमन्ना भाटियानं या दोन्ही लोकप्रिय नायकांसह काम केलं असून, आता तिनं त्यांच्यासह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. तमन्नानं ‘लल्लनटॉप’ला मुलाखत दिली. त्यामध्ये तिनं सलमान व शाहरुखसह काम केल्याचा अनुभव सांगितला आहे. अभिनेत्रीनं सलमानसह चित्रपटात; तर शाहरुखसह जाहिरातीमध्ये काम काम केलं होतं. त्याबद्दलची माहिती तिनं दिली आहे.
तमन्नानं ‘दबंग’मध्ये ‘मुन्नी बदनाम हुई’ गाण्यावर नृत्य केलं होतं. त्यावेळी ते या गाण्यासाठी दुबईला गेले होते. मुलाखतीमध्ये तमन्नाला त्या वेळचा फोटो दाखवण्यात आला. फोटोबद्दल बोलताना तमन्ना म्हणाली, “तो सलमान खानच आहे. हा दुबईमधील फोटो आहे. मी त्याला तिथे रिहर्सल करताना पाहिलं तेव्हा तो खूप गांभीर्यानं सलग दोन-अडीच तास रिहर्सल करत होता. त्याच्याकडून खूप प्रेरणा मिळते.”
सलमानबद्दल अभिनेत्री पुढे म्हणाली, “गाणं सुरू होतं. लोक येत-जात होते; पण तो मात्र सलग तिथे रिहर्सल करीत होता. स्टेजवर इतका वेळ थांबणं खूप कठीण असतं. खूप एनर्जी लागते त्यासाठी.” पुढे तमन्नानं शाहरुखसह एका जाहिरातीत काम करण्याबद्दलची माहिती दिली. तिला तिचा व शाहरुखचा फोटो दाखवण्यात आला होता. फोटो पाहताच ती स्मित हास्य करीत म्हणाली, “ज्याच्यामुळे आम्हाला प्रेम म्हणजे काय असतं हे समजलं. मला आठवतं की, आम्ही एक जाहिरात केली होती. तेव्हा शाहरुखने सगळ्यांबरोबर फोटो काढले होते. सेटवर जवळपास २०० लोक होते. त्यानं त्या सगळ्यांबरोबर फोटो काढले.”
मुलाखतीमध्ये पुढे अभिनेत्रीला ती अजय देवगणला सर म्हणते; पण शाहरुखला सर म्हणत नाही याबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर अभिनेत्री म्हणाली, “जेव्हा मी अजयला भेटली तेव्हाची माझ्याकडे एक आठवण आहे. मी लहान होते. तेव्हापासून मी त्यांना ओळखते आणि त्यामुळे मी अजय देवगणला सर म्हणते. शाहरुखबरोबर मी खूप नंतर काम केलं.”