Tanishaa Mukerji opens up about past relationships: अभिनेत्री तनिषा मुखर्जीने काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत तिच्या रिलेशनशिप आणि ब्रेकअपबद्दल वक्तव्य केले होते. उदय चोप्राबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर त्रास झाला. त्या नात्यातून बाहेर येणे कठीण होते. त्या प्रसंगाला सामोरे जाणे कठीण होते, असे तनिषा म्हणाली होती.

तनिषा मुखर्जी काय म्हणाली?

तनिषा असेही म्हणाली होती की, उदय आणि मी नात्यात येण्याआधीपासून एकमेकांचे चांगले मित्र होतो. खूप आधीपासून एकमेकांना ओळखत होतो. त्यामुळे त्या नात्यातून बाहेर पडताना त्रास झाला. तरीही मी आशावादी आहे.

अनेक वेळा ब्रेकअप झाल्यानंतरही नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असल्याचे अभिनेत्रीने म्हटले. ती म्हणाली, “मी अशी व्यक्ती आहे, ज्या गोष्टी घडतात, त्याच्या चांगल्या बाजूकडे मी बघते. मला नेहमी असे वाटते की, जे काही घडते, ते चांगल्यासाठी घडते. तो आपल्या आयुष्याचा भाग असतो. एखादी गोष्ट संपते, तेव्हा पुढे जाणे गरजेचे असते. नाती तुटल्यामुळे, ब्रेकअप झाल्यामुळे माझ्यात कडवटपणा आला नाही.”

उदय चोप्रा व तनिषाने नील एन निक्की या चित्रपटात एकत्र काम केले होते. तनिषा २०२४ मध्ये आलेल्या ‘लव्ह यू शंकर’ चित्रपटात दिसली होती. २०२३ मध्ये ‘झलक दिखला जा ११’ या डान्स रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती.

आता ब्रेकअपबद्दल आपण अनेकदा ऐकत असतो. अनेक जण ब्रेकअपनंतर बऱ्याचदा नैराश्यात जातात. त्यांना कसे सामोरे जायचे हे त्यांना माहीत नसते. आता ब्रेकअपसारख्या प्रसंगांना कसे सामोरे जावे याबद्दल मानसशास्त्रज्ञ राशी गुरनानी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसबरोबर संवाद साधला.

ब्रेकअपनंतर तज्ज्ञांच्या मदतीची गरज आहे की नाही, हे कसे ओळखावे?

राशी गुरनानी म्हणाल्या की ब्रेकअपनंतर दुःख होणे स्वाभाविक आहे. सुरुवातीच्या काळात दुःख, भूक न लागणे, झोपे येत नाही. तसेच त्या व्यक्तीबद्दल चिंता वाटते. या सगळ्याचा त्या व्यक्तीला त्रास होतो. पण, जेव्हा हे दु:ख निराशावादात बदलते. माणूस आशावादी राहत नाही. व्यक्ती दैनंदिन गोष्टी करणे टाळतो. माणसाला मानसिकदृष्ट्या त्रास व्हायला सुरुवात होते. अशा वेळी तज्ज्ञांची मदत घेणे महत्त्वाचे असते. ती व्यक्ती कमजोर झाली आहे म्हणून नाही तर ती व्यक्ती तिच्या भावनांमध्ये कुठेतरी अडकलेली असते आणि तिला थोड्या मार्गदर्शनाची गरज असते.

राशी गुरनानी असेही म्हणाल्या की, झालेल्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे, त्याच्या चांगल्या बाजूकडे पाहणे महत्त्वाचे असते. परिस्थितीशी जुळवून घेण्याची मानसिकता तयार होते. आशावाद वाढतो. आपल्याला होत असलेले दु:ख, राग आणि आपल्या इतर भावना स्वीकारणे, या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या भावना नाकारणे, टाळणे हा त्यावरचा उपाय असू शकत नाही. जेव्हा भावना दडपल्या जातात, तेव्हा त्याचा भविष्यात पुन्हा कधीतरी त्रास होऊ शकतो. याउलट त्या भावना स्वीकारल्या, तर त्यातून बाहेर पडणे सोपे होते.

जवळचे मित्र मैत्रिणी, कुटुंबीय अशा वेळी बरोबर असतील, तर त्यांना ब्रेकअपमधून बाहेर पडणे सोपे होते. जर असे कोणी मित्र-मैत्रिणी नसतील, तर अशा वेळी तज्ज्ञांची मदत घेणे महत्त्वाचे असते, असेही राशी गुरनानी यांनी सांगितले.