Tanushree Dutta Talks About Bigg Boss : बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच आता ती चर्चेत आलीये ते ‘बिग बॉस’मुळे. अभिनेत्रीनं नुकतीच ‘बिग बॉस’बद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये तिनं तिला ‘बिग बॉस’ची ऑफर आल्याचं म्हटलं आहे.
तनुश्री दत्ताने तिला ‘बिग बॉस’साठी विचारणा झाली असून कोट्यवधी रुपयांची ऑफरही मिळाल्याचं म्हटलं आहे; परंतु तिने ती ऑफर नाकारली असून बिग बॉसमध्ये न जाण्यामागचं कारण सांगितलं आहे. ‘बॉलीवूड ठिकाना’शी संवाद साधताना ती म्हणाली, “गेल्या ११ वर्षांपासून मला बिग बॉससाठी विचारणा होत आहे आणि ११ वेळा मी ही ऑफर नाकारली आहे. दरवर्षी मला यासाठी विचारलं जातं आणि दरवर्षी मी नकारच देते.”
मी बिग बॉससारख्या घरात राहू शकत नाही – तनुश्री दत्ता
तनुश्री पुढे म्हणाली, “मी बिग बॉससारख्या घरात राहू शकत नाही. मी माझ्या कुटुंबाबरोबरही राहत नाही. आमच्यातील प्रत्येकाकडे हक्काची जागा आहे.” बिग बॉसकडून ऑफर झालेल्या मानधनाबद्दल ती पुढे म्हणाली, ” ‘बिग बॉस’साठी मला १.६५ कोटींची ऑफर आलेली. कारण- त्यांनी तेवढीच रक्कम अजून एका बॉलीवूड सेलिब्रिटीला दिली आहे. ‘बिग बॉस’मधील एका व्यक्तीनं मला ‘बिग बॉस’मधून मला हवे असतील, तर ते आणखी पैसे देतील, असं सांगितलेलं; पण मी नकार दिला.”
तनुश्री पुढे म्हणाली, “त्यांनी मला कितीही मोठी ऑफर दिली तरीही मी जाणार नाही. तिथे स्त्री आणि पुरुष एकाच बेडवर झोपतात, तिथेच भांडतात, मला ते जमणार नाही. मी माझ्या डाएटबाबतही खूप शिस्तप्रिय आहे. त्यांना असं वाटूच कसं शकतं की, मी रिअॅलिटी शोसाठी कुठल्या तरी पुरुषाबरोबर एक बेड शेअर करेन. मी इतक्या खालच्या थराची व्यक्ती नाही. ते किती कोटी ऑफर करतायत यानं मला काही फरक पडत नाही.”
दरम्यान, तनुश्री दत्ताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं २००५ साली आलेल्या ‘आशिक बनाया आपने’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यामध्ये तिच्यासह इमरान हाश्मी झळकलेला. त्यानंतर तिनं ‘३६ चायना टाउन, भागम भाग, रिस्क आणि अशा अनेक चित्रपटांत कामं केली आहेत. शेवटची ती २०१३ साली ‘सुपर कोप्स वर्सेस सुपर व्हीलन्स’मध्ये झळकलेली.