‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर विवेक अग्निहोत्री हे नाव प्रत्येकालाच परिचयाचं झालं. प्रेक्षकांनी चित्रपट चांगलाच उचलून धरला तर काही लोकांनी यावर टीका केली. अर्थात याचा विवेक अग्निहोत्री यांना फायदाच झाला. त्यानंतर इतरही घटनांवरही चित्रपट काढायची विनंती होऊ लागली. दरम्यान विवेक अग्निहोत्री हे ‘दिल्ली फाइल्स’ या प्रोजेक्टवर काम करत असल्याची चर्चा होऊ लागली, खुद्द अग्निहोत्री यांनीदेखील याची पुष्टी केली, पण आता एक वेगळीच बातमी समोर येत आहे.

लखनऊमधील ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या कार्यालयाला विवेक अग्निहोत्री यांनी भेट दिली तेव्हा त्यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्ट बद्दल खुलासा केला आहे. या नव्या कथेबद्दल बोलताना अग्निहोत्री म्हणाले, “मी स्वतः यूपी कानपूरचा आहे, आणि मी आजवर ज्या पद्धतीचे चित्रपट केले ते इथे करणं शक्य नव्हतं, पण आता माझ्या हाती अशी कथा लागली आहे जी मी इथे राहून सादर करू शकतो.” मध्यंतरी जेव्हा विवेक अग्निहोत्री हे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटले तेव्हा इथल्या स्थानिक लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल याविषयी अग्निहोत्री यांनी चर्चा केली होती आणि इथल्या हिंदी भाषिक लोकांनाही या क्षेत्रात सामील करून घेता येऊ शकतं असा विचार अग्निहोत्री यांनी मांडला होता.

आणखी वाचा : आलिया-रणबीर आणि त्यांच्या कन्यारत्नाला ‘अमूल’कडून खास शुभेच्छा; फोटो पाहून चाहते म्हणाले…

देशात कोविड काळात कशाप्रकारे covaxin ही लस तयार करण्यात आली ती गोष्ट विवेक अग्निहोत्री चित्रपटाच्या माध्यमातून मांडणार आहेत. १० डिसेंबरपासून ४५ दिवस अग्निहोत्री या चित्रपटाचं चित्रीकरण करणार आहेत. याविषयी बोलताना अग्निहोत्री यांनी स्पष्ट केलं की, “मी आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल यांचं पुस्तक (Balram Bhargava’s Going Viral – Making of Covaxin: The Inside Story) वाचलं आहे. या पुस्तकात कशाप्रकारे कित्येक लोकांनी, महिलांनी अजिबात न थकता एवढ्या लसी तयार केल्या आणि २५० कोटी लोकांना त्या देण्यात आल्या. बऱ्याच सामान्य लोकांना ही गोष्ट ठाऊक नाहीये, त्यामुळे ही गोष्ट मी लोकांसमोर घेऊन येणार आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, निवेदिता भट्टचार्य, हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय ही कथा संपूर्णपणे एका पात्राची गोष्ट असेल आणि यात ९०% कलाकार हे स्थानिक असतील असं आश्वासनही अग्निहोत्री यांनी दिलं आहे. तसेच ‘दिल्ली फाइल्स’वर अजूनही रिसर्च सुरू असून या चित्रपटानंतरच त्यावर काम सुरू होईल असंही विवेक अग्निहोत्री यांनी स्पष्ट केलं आहे.