Sanjay Dutt’s first wife Richa Sharma: संजय दत्त अनेकदा त्याची पत्नी मान्यता दत्तबरोबर सार्वजनिक ठिकाणी दिसतो. मात्र, अनेकांना हे माहीत नाही की, मान्यता ही संजय दत्तची तिसरी पत्नी आहे.

मान्यता यांच्याबरोबर लग्नगाठ बांधण्याआधी संजय दत्तने रिचा शर्माबरोबर पहिले लग्न केले होते. त्यानंतर त्याने एअर होस्टेस रिहा पिल्लईबरोबर लग्न केले होते. १९९८ ला त्यांनी लग्नगाठ बांधली आणि २००८ ला त्यांनी घटस्फोट घेतला होता. मात्र, रिचा शर्माबरोबरचे लग्न संजय दत्तच्या आयुष्यातील सगळ्यात दु:खद काळ म्हणून पाहिला जातो.

आता रिचा शर्मा कोण होती आणि नेमके काय घडले होते, ते जाणून घेऊ. १९६४ साली दिल्लीमध्ये रिचाचा जन्म झाला. त्यानंतर ती तिच्या कुटुंबासह न्यू यॉर्कला गेली. मात्र, हिंदी चित्रपटांविषयी तिला कायमच ओढ वाटत राहिली.

देव आनंद दिग्दर्शित ‘हम नौजवान’ या चित्रपटातून रिचा शर्माने १९८५ साली बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याच चित्रपटातून अभिनेत्री तब्बूनेदेखील पदार्पण केले. या चित्रपटानंतर रिचा शर्माने १९८६ साली प्रदर्शित झालेल्या इन्साफ की आवाज, १९८७ साली प्रदर्शित झालेल्या सडक छाप, तसेच अनुभव या चित्रपटांत काम केले.

बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर रिचाने संजय दत्तला डेट करण्यास सुरुवात केली. संजय दत्त त्यावेळी यशाच्या शिखरावर होता. संजय दत्तने रिचा शर्माला प्रपोज केले. मात्र, त्यांचे हे नाते पालक स्वीकारतील की नाही, याबद्दल रिच्याच्या मनात शंका होती. कारण- संजय दत्त ड्रग्जच्या आहारी गेला होता. त्याच्याबद्दल फारसे चांगले बोलले जायचे नाही. पण, संजय दत्तने तो चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न करेन, अशी खात्री रिचाला दिली. त्यानंतर त्यांनी १९८७ साली लग्नगाठ बांधली. लग्नाच्या एक वर्षानंतर त्यांना मुलगी झाली. तिचे नाव त्यांनी त्रिशला ठेवले. त्यानंतर रिचा आणि संजय दत्तच्या आयुष्याला एक वेगळे वळण लागले. रिचाला कर्करोग झाल्याचे निदान झाले.

रिचावर सर्वोत्तम उपचार व्हावेत, यासाठी तिला उपचारांसाठी न्यू यॉर्कमध्ये नेण्यात आले. मात्र, त्यादरम्यान, संजय दत्त काही चित्रपटांसाठी शूटिंग करत होता. त्यामुळे तो रिचाला फार वेळ देऊ शकला नाही. तो त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र झाला. मग खलनायक या चित्रपटातील संजय दत्तची सहकलाकार माधुरी दीक्षितबरोबर तो नात्यात असल्याचा अफवा पसरू लागल्या.

उपचारानंतर रिचा बरी झाली आणि त्यानंतर ती भारतात परतली. संजय दत्तला तिच्या येण्याबद्दल कळवूनही तो तिला घरी घेऊन जाण्यासाठी विमानतळावर आला नाही, असे रिचाच्या बहीणीने माध्यमांना सांगितले होते. सुरुवातीला संजय माधुरीला सोडून रिचाकडे परत येईल अशी आशा होती; पण असे घडले नाही. ती त्रिशलाबरोबर न्यू यॉर्कला परतली. त्यानंतर संजय दत्तने तिला घटस्फोटाची कागदपत्रेही पाठवली. त्याचा तिला खूप मोठा धक्का बसला.

संजय दत्तबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर रिचाला पुन्हा कर्करोगाचे निदान झाले. १९९६ मध्ये वयाच्या ३२ व्या वर्षी रिचाचा मृत्यू झाला. संजय दत्त तिला भेटू शकला नाही. कारण- १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर संजय दत्तला अटक करण्यात आली होती. तिच्या आजी-आजोबांनी न्यू यॉर्कमध्ये त्यांची मुलगी त्रिशलाचे संगोपन केले.

दरम्यान, संजय दत्त नुकताच ‘हाऊसफुल ५’मध्ये दिसला होता. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.