Dhadak 2 Fame Tripti Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या करण जोहरची निर्मिती असलेल्या ‘धडक २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामधून तिच्यासह अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदीही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अशातच अभिनेत्रीने चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना खासगी आयुष्यातील काही अनुभव सांगितले आहेत.

तृप्ती डिमरी व सिद्धार्थ चतुर्वेदी यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘धडक २’ येत्या १ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तृप्तीने विधी तर सिद्धार्थने निलेश हे पात्र साकारलं आहे. आता अभिनेत्रीने तिला चित्रपटातील तिच्या भूमिकेकडून खूप काही शिकायला मिळाल्याचं म्हणत खऱ्या आयुष्यामध्येही तिच्यातील गुण आत्मसात करायला आवडतील याबाबत सांगितलं आहे.

तृप्ती डिमरी झाली व्यक्त

तृप्ती डिमरी म्हणाली, “मी खूप अंतर्मुख स्वभावाची आहे. खूप गोष्टींना सामोरी गेली आहे आणि कधीच त्या विरोधात काहीच बोलले नाही. ३० वर्षांच्या आयुष्यात मी कितीतरी गोष्टींबद्दल मौन बाळगले आहे. माझी कधी हिंमत झाली नाही लोकांना सांगण्याची की हे चुकीचं आहे वगैरे. मी शाझियाला (चित्रपटाची दिग्दर्शिका) म्हणाले की, मला विधीसारखं व्हायचं आहे, कोणालाही न घाबरता खरं बोलण्याचं धाडस असणं गरजेचं आहे; आता मी गोष्टींसाठी उभी राहते.”

‘धडक २’ चित्रपटाचं शाझिया इक्बालने दिग्दर्शन केलं आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर व इशान खट्टर यांची मुख्य भूमिका असलेला आणि करणची निर्मिती असलेल्या ‘धडक’ या चित्रपटाचा ‘धडक २’ पुढचा भाग आहे. ‘धडक’ हा ‘परियेरुम पेरुमल’ या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता.

तृप्तीने ‘लैला मजनू’ चित्रपटातून पहिल्यांदा मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. हा चित्रपट २०१८ साली आलेला. परंतु, अभिनेत्री खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली ते ‘अॅनिमल’ चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे. यामध्ये ती रणबीर कपूरसह झळकली होती. यानंतर ती ‘बॅड न्यूज’, ‘भूल भुलय्या ३’ या चित्रपटांमध्ये झळकली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तृप्ती डिमरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर ती संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ चित्रपटातून झळकणार आहे. यासह ती विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटातूनही झळकणार असून यामध्ये ती शाहिद कपूरसह काम करणार आहे.