अभिनेत्री ट्विंकल खन्ना लग्नानंतर अभिनय क्षेत्रापासून दूर राहिली. अभिनयाबरोबरच ट्विंकल लेखिका आणि दोन मुलांची आईदेखील आहे. जरी ट्विंकल मनोरंजनसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा आपली मतं ती परखडपणे मांडताना दिसते. अलीकडेच पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याबद्दल ट्विंकलने आपलं मतं मांडलं. ट्विंकलच्या टाईम्स ऑफ इंडियाच्या लेखात ट्विंकलने लिहिलं की, "अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा इतका भव्य झाला की, आता कोणाचंही लग्न यापुढे लहानच वाटेल. पण, मला काय नीता वहिनीसारखं नाचायला येत नाही. लॉकडाऊनच्या वेळेस जेव्हा मी 'तम्मा तम्मा लोगे' या गाण्यावर नाचायचा प्रयत्न केला होता, तेव्हा देवालापण माझा डान्स पाहावा असा वाटला नसेल; कारण त्यानंतर मी पडले आणि माझा पाय फ्रॅक्चर करून घेतला. अक्षय रात्री १० नंतर क्वचितच जागा राहू शकतो आणि आम्ही दोघेही २० पेक्षा जास्त लोकांसाठी डिनर पार्टी आयोजित करण्याच्या विचारानेचं चिंताग्रस्त होऊन जातो." पुढे ट्विंकलने लिहिलं, "जर माझ्या मुलांना मी आनंदी व्हावे असे खरोखरच वाटत असेल तर सर्वात चांगली गोष्ट ते करू शकतील ती म्हणजे पळून जाऊन लग्न करणे." हेही वाचा. “त्यानं हात ठेवून फोटो काढला नाही, तर…”, ओरीच्या सिग्नेचर पोजबद्दल रणवीर सिंहचे वक्तव्य, म्हणाला… दरम्यान, ट्विंकल खन्नाबद्दल सांगायचं झालं तर १९९५ रोजी प्रदर्शित झालेल्या 'बरसात' या चित्रपटाद्वारे ट्विंकलने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर अनेक सिनेमे करत ट्विंकलने प्रसिद्धी मिळवली. १७ जानेवारी २००१ रोजी ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार लग्नबंधनात अडकले. अभिनयाबरोबरच ट्विंकल उत्तम लेखिका असल्याने २०१५ साली 'मिसेज फनीबोन्स' हे पहिलं पुस्तक ट्विंकलने प्रकाशित केलं. 'पॅड मॅन', 'खिलाडी' अशा अनेक सिनेमांची ती सह-निर्मातीदेखील आहे.