ट्विंकल खन्ना व काजोल सध्या त्यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या टॉक शोमुळे चर्चेत आहेत. अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रीमियर झालेल्या या शोमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी पाहुणे म्हणून सहभागी झाले आहेत. आता या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये जान्हवी कपूर आणि करण जोहर दिसत आहेत. मुलाखतीदरम्यान काजोल आणि ट्विंकलने या जोडीला नात्यांमधील बेवफाईबद्दल प्रश्न विचारला. जान्हवीने या प्रश्नावर दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या शोचा एक मजेदार प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. ‘धिस अँड दॅट’ या सेगमेंटमध्ये, काजोल आणि ट्विंकल जान्हवीला नात्यांशी संबंधित अनेक प्रश्न विचारतात. पण नात्यांमधील बेवफाईबद्दल विचारलेल्या प्रश्नांने लक्ष वेधले आहे.
शोमध्ये करण आणि जान्हवीला पहिला प्रश्न विचारण्यात आला. तो असा की “लग्नात सर्वात जास्त काय महत्त्वाचे आहे? प्रेम की कम्पॅटिबिलीटी?” यावर जान्हवी प्रेम म्हणाली. दुसरीकडे काजोल आणि करण जोहर यांनी कम्पॅटिबिलीटीवर भर दिला. काजोल म्हणाली, “कम्पॅटिबिलीटीशिवाय प्रेम कधीच टिकू शकत नाही. जर कम्पॅटिबिलीटी नसेल तर लग्नानंतर सर्वात आधी प्रेम संपतं.” करणनेही काजोलच्या उत्तराचं समर्थन केलं.
विवाहबाह्य संबंधांबद्दल ट्विंकल खन्ना काय म्हणाली?
पुढे ट्विंकल आणि काजोलने करण जोहर आणि जान्हवी कपूरला फसवणुकीबद्दल प्रश्न विचारला. इमोशनल चिटींग व फिजिकल चिटींग यापैकी कोणत्या प्रकारची फसवणूक केल्यास तुझ्यासाठी नातं संपेल, असं जान्हवीला विचारण्यात आलं. त्यावर जान्हवीने फिजिकल चिटींग नात्यातील डील ब्रेकर असल्याचं म्हटलं. तर इतरांनी त्यास नकार दिला. यावेळी ट्विंकलने दिलेली प्रतिक्रिया सर्वाधिक चर्चेत आली. “जान्हवी अजून खूप तरुण आहे. आपण जे पाहिलंय त्यातलं काहीच तिने पाहिलेलं नाही. रात गई, बात गई” असं ती वन नाइट स्टँड्सबद्दल म्हणाली. तर करणनेही फिजिकल चिटींग मोठी गोष्ट नसल्याचं म्हटलं. जान्हवी मात्र तिच्या मतावर ठाम राहिली.
हा प्रोमो सध्या खूप व्हायरल होत आहे आणि लोक जान्हवी कपूरच्या प्रतिक्रियेचे आणि प्रतिसादाचे कौतुक करत आहेत. दुसरीकडे काजोल आणि ट्विंकल चुकीचा संदेश देत असल्याचं म्हणत ट्रोल केलं जात आहे. करण जोहरनेही काजोल आणि ट्विंकलला पाठिंबा दिला आणि त्यामुळे त्याच्यावरही टीका होत आहे.