Veteran Actor Dharmendra Admit To Hospital : ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी अपडेट समोर येत आहे. गेल्या ४–५ दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुटीन चेकअपसाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांना गुरुवारी रात्री अचानक श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली, त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांना आयसीयूमध्ये (ICU) ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करीत असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, त्यांच्या डिस्चार्जबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

विक्की लालवानी यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास अडचण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील एका प्रतिनिधीने त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देत सांगितले, “धर्मेंद्रजी आयसीयूमध्ये आहेत; पण त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचा हार्ट रेट ७० आहे, ब्लडप्रेशर १४०/८० आहे. त्यामुळे सध्या काळजी करण्यासारखे काही कारण नाही.”

इंडिया टुडेच्या अहवालानुसार, सुरुवातीला असे सांगण्यात आले होते की, धर्मेंद्र नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. काही जणांनी त्यांना रुग्णालयात पाहून चुकीच्या बातम्या पसरवल्या. तर एनडीटीव्हीनुसार, धर्मेंद्र पाच दिवसांपासून रुग्णालयात असून, डॉक्टर त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी अद्याप याबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे येत्या ८ डिसेंबर रोजी वयाची नव्वदी पार करणार आहेत. वयाच्या या टप्प्यावरही ते चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. ते लवकरच ‘इक्कीस’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

अशातच आता त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर आली. त्यामुळे अनेकांनी चिंताही व्यक्त केली. पण, काळजी करण्यासारखे काही नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.