आयपीएल-२०२३ च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. चेन्नईने पाचवा करंडक जिंकत सर्व चाहत्यांची मने जिंकली. अंतिम सामन्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयपीएल-२०२३ च्या शेवटच्या सामन्याला बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांनीही हजेरी लावली होती. या वेळी विकी-साराच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटातील “फिर और क्या चाहिए…” हे गाणे स्टेडियममध्ये वाजवण्यात आले.
विकी कौशल आणि सारा अली खान या दोघांनीही, अंतिम चेंडूवर चौकार मारत चेन्नईने कसा सामना जिंकला याचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएल विजेतेपदावर नाव कोरल्यावर विकी-सारा जल्लोष करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
विकी-साराने शेअर केलेला व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या दोघांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करीत “ओव्हर अॅक्टिंगचे पैसे कापा…”असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने “हे दोघेही संपूर्ण सामना संपेपर्यंत गुजरातला पाठिंबा देत होते, आता फक्त नाटक करीत आहेत.” तसेच अनेकांनी “गुजरात संघ जिंकला असता तरी दोघे एवढेच खूश झाले असते…” अशा कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, विकी कौशल आणि सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे दोघेही सध्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. चित्रपटात राकेश बेदी, शारिब हाश्मी, नीरज सूद यांसारखे अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.