Rahul Vaidya calls Virat Kohlis fans Jokers: प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर विराट कोहली काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व अभिनेत्री अवनीत कौरच्या पेजला लाइक केल्याने तो चर्चेत आला होता.
विराट कोहलीकडून अवनीत कौरचे फॅन पेज लाइक झाल्याचे समोर येताच त्याची मोठी चर्चा सुरू झाली. त्यानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदममुळे ते पेज लाइक झाले असावे. त्यामुळे याबाबत कोणत्याही चर्चा करू नयेत, असे स्पष्ट केले. आता विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
लोकप्रिय गायक राहुल वैद्यची इन्स्टाग्राम पोस्ट आणि एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. राहुल वैद्यने विराट कोहलीबाबत केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. अवनीत कौरच्या पेजला लाइक केल्याच्या विराट कोहलीच्या स्पष्टीकरणाचा संदर्भ देत राहुल वैद्य म्हणाला, “विराट कोहलीने मला ब्लॉक केले आहे, हे तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे. मला वाटतं की, तीदेखील इन्स्टाग्रामची चूक आहे. विराट कोहलीने मला ब्लॉक केलेले नाही. इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदमने विराटला म्हटले असेल की, मी तुझ्या वतीने राहुल वैद्यला ब्लॉक करते.”

राहुल वैद्यचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. विराटच्या चाहत्यांनी राहुलच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट्स केल्या. अनेक चाहत्यांनी त्याची पत्नी व बहिणीबाबत अपशब्द वापरले. राहुलला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर राहुल वैद्यने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये त्याने लिहिले, “विराट कोहलीचे चाहते विराटपेक्षाही मोठे जोकर आहेत”. त्यानेही असेही लिहिले, “तुम्ही मला शिवीगाळ करीत आहात, ते ठीक आहे. पण, तुम्ही माझ्या पत्नी व बहिणीलादेखील शिवीगाळ करीत आहात. त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे मी बरोबर होतो. तुम्ही सर्व विराट कोहलीचे चाहते जोकर आहात. दोन पैशांचे जोकर आहात.”

या सर्व प्रकारानंतर राहुल वैद्यने झूमशी संवाद साधला. त्यावेळी तो म्हणाला, “विराट कोहलीने मला सोशल मीडियावर ब्लॉक केले आहे. त्याचे कारणही मला माहीत नाही. मी त्याचा चाहता होतो. आजही क्रिकेटर म्हणून मी त्याचा चाहता आहे; मात्र तो माणूस म्हणून मला आवडत नाही.”
पुढे राहुल वैद्य म्हणाला, “विराटच्या चाहत्यांनी मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. मी वाईट शब्द वापरण्याऐवजी एक स्टेटस ठेवले, ज्यामध्ये त्यांना जोकर म्हटलं. त्यावरून पुन्हा मला, माझ्या बहिणीला, पत्नीला शिवीगाळ केली जात आहे. त्यांच्याबद्दल अपशब्द बोलले जात आहेत. सध्या हे सगळं सामान्य झालं आहे. तुम्ही जोकर्सकडून काय अपेक्षा ठेवू शकता?”
दरम्यान, राहुल वैद्यची अनेक गाणी लोकप्रिय आहेत. तो बिग बॉस १४ मुळे मोठ्या चर्चेत आला होता. तो खतरों के खिलाडीमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. सध्या तो लाफ्टर शेफ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसेल.