Vivek Agnihotri & Pallavi Joshi’s film The Bengal Files Shows cancelled in Mumbai : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट आज ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला. अशातच आता या चित्रपटाचे मुंबईतील शो रद्द झाल्याने प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.

‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट १९४६ च्या बंगाल दंगली आणि नोआखाली हत्याकांडावर आधारित असून, हा चित्रपट पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शित झाला नाहीये. परंतु, देशातील इतर भागांत चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र, आता मुंबईतील कांजूरमार्ग येथेही या चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले आहेत. एका नेटकऱ्याने एक्सवर यासंबंधित माहिती दिली आहे.

‘द बंगाल फाइल्स’चे मुंबईतील कांजूरमार्ग येथील शो रद्द

एका नेटकऱ्याने एक्सवर कांजूरमार्ग येथील हुमा मॉलमधील चित्रपटागृहाच्या तिकीट काउंटरवरील व्हिडीओ शेअर केला आहे. जिथे ‘द बंगाल फाइल्स’चे शो लागणार होते. या व्हिडीओमध्ये नेटकऱ्याने संताप व्यक्त करीत म्हटलं, “इथे अनेक लोक ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी वाट पाहत आहेत. अनेक जण रांगेत उभे आहेत. ज्या लोकांनी आधीच चित्रपटाचे तिकीट बुक केले होते, त्यांचे शो रद्द झाले आहेत. कुठलीही माहिती न देता, त्यांनी अचानक शो रद्द केले. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, कोलकाता नाहीये हा”.

‘द बंगाल फाइल्स’बद्दल नेटकऱ्यानं पुढे म्हटलं, “आम्ही सकाळी ९ च्या शोसाठी इथे आलो होतो आणि आता हा शोच रद्द करण्यात आला आहे. इथे अनेक जण आहेत. किमान ५० लोक तरी सकाळचा शो पाहण्यासाठी आले आहेत.” चित्रपटाच्या निर्मात्या पल्लवी जोशी यांनीसुद्धा नुकतंच यासंबंधीचं पत्र राष्ट्रपतींना द्रोपदी मुर्मू यांना लिहिलं होतं.

दरम्यान, ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटात पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, अनुपम ‘खेर यांसारखे कलाकार आहेत. अनेक दिवसांपासून या चित्रपटासंबंधित चर्चा सुरू होत्या. आता अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.