‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची गेल्यावर्षी चांगलीच चर्चा झाली. चित्रपटाला मिळालेलं अभूतपूर्व यश आणि त्यावरून झालेली टीका यामुळे विवेक सोशल मीडियावर सतत चर्चेत होते. नुकतंच ‘पठाण’मधील बिकिनी वादातसुद्धा त्यांनी उडी घेत त्यांचं मत मांडलं. यावरून ते प्रचंड ट्रोलही झाले. विवेक सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत आणि सध्या ते त्यांच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत आहेत.
नुकतंच विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर नवीन वर्षाचं स्वागत केलं. त्यादरम्यानचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विवेक यांनी त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये विवेक यांनी त्यांच्या टीमबरोबरच आपली पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशीचंही कौतुक केलं आहे.
आणखी वाचा : “हे अजिबात सोप्पं नव्हतं, तब्बल १८ वर्षं…” भारताचं नागरिकत्व स्वीकारण्याबाबत अदनान सामीचा खुलासा
व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभेच्छा दिल्यानंतर विवेक यांनी पल्लवीचं कौतुक केलं. “ही आहे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी माहिला निर्माती.” असं म्हणत विवेक यांनी तिचं कौतुक केलं. यावर पल्लवी काहीशी नाराज झाली, कारण महिला म्हंटलेलं तिला खटकलं. हसतच तिने विवेक यांना याबद्दल नाराजी व्यक्त करून दाखवली. तिचं म्हणणं ऐकल्यावर लगेच विवेक यांनी त्यांचे शब्द मागे घेत ‘भारतातील सर्वात यशस्वी निर्माती’ असा उल्लेख केला. पल्लवी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सहनिर्माती होती.
विवेक अग्निहोत्री सध्या त्यांच्या ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. हा चित्रपट कोविड काळातील भारतात बनलेल्या लसीच्या उत्पादनाबद्दल आणि त्यामागील संघर्षाबद्दल भाष्य करणारा आहे. १५ ऑगस्ट २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.