Wamiqa Gabbi Talks about Triptii Dimri : ‘भूल चूक माफ’फेम अभिनेत्री वामिका गब्बी सध्या तिच्या या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. ‘भूल चूक माफ’मधून तिला मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, त्यामुळे या चित्रपटातून तिला खऱ्या अर्थाने मोठा ब्रेक मिळाला असं म्हणायला हरकत नाही. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच वामिकाने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने अभिनेत्री तृप्ती डिमरी व तिच्यामध्ये होणाऱ्या तुलनेबद्दल मत व्यक्त केलं आहे.
वामिकाने नुकतीच ‘इन्स्टंट बॉलीवूड’ला मुलाखत दिली. यामध्ये तिला “तू इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहेस, लोकांना तुझ्या कामाचं कौतुक वाटतं, तसंच तृप्ती डिमरीबाबतसुद्धा लोकांना हेच वाटत आहे. तिच्या भूमिकांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो, त्यामुळे तुला तृप्ती तुझी स्पर्धक आहे असं वाटतं का?” असं विचारण्यात आलं होतं. यावर वामिका म्हणाली, “नाही, ती मला माझी स्पर्धक वाटत नाही. कलाकार म्हणून मला अजिबात असं वाटत नाही. तिचा प्रवास वेगळा आहे, माझा वेगळा आहे आणि प्रत्येकाचा प्रवास सारखा असावा असं नाही.”
वामिका पुढे म्हणाली, “स्पर्धा करण्यात काहीच अर्थ नाही. माझी अशी इच्छा आहे की, आम्हा सगळ्या कलाकारांना आम्हाला जे काम करायचं आहे ते करण्याची संधी मिळावी आणि तसंही सगळं काम एकच व्यक्ती करू शकत नाही. ज्याच्या नशिबात जे लिहिलेलं असतं त्याला ते मिळतंच. मला असं वाटतं, तिनेही चांगले चित्रपट करावेत, मलासुद्धा चांगल्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळावी; आम्ही एकाच इंडस्ट्रीचा भाग आहोत.”
दरम्यान, वामिकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती नुकतीच ‘भूल चूक माफ’ या चित्रपटात झळकली. अभिनेता राजकुमार रावसह ती यामधून मुख्य भूमिकेत झळकली. ७ मे २०२५ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. वामिकासाठी हा तिच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा चित्रपट होता. यामध्ये ती मुख्य भूमिकेत झळकली आहे. तिने या चित्रपटातून पहिल्यांदाच राजकुमार रावसह काम केलं आहे. यापूर्वी ती वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ चित्रपटात झळकली होती. यामध्ये वरुण धवन, किर्ती सुरेश आणि वामिका हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते.