Yami Gautam Education: अभिनेत्री यामी गौतमने २०१२ ला ‘विकी डोनर’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘सनम रे’, ‘बदलापूर्’, ‘बाला’, ‘गिन्नी वेड्स सनी’, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’, ‘ओएमजी’, ‘आर्टिकल ३७०’, ‘लॉस्ट’, ‘चोर निकल के भागा’, ‘दसवी’, अशा अनेक चित्रपटांत काम केले आणि तिच्या भूमिका लोकप्रियही ठरल्या. आता अभिनेत्री लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यामी गौतमच्या चित्रपटांबद्दल तिच्या अभिनय क्षेत्रातील कारकि‍र्दीबद्दल सर्वांनाच माहीत आहे. मात्र, अभिनेत्रीने कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेतले आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? खरे तर यामीला एका वेगळ्याच क्षेत्रात करिअर करायचे होते. तिचे शिक्षण काय झाले आहे ते जाणून घेऊ…

यामीचा जन्म २८ नोव्हेंबर १९८८ साली हिमाचल प्रदेशमधील बिलासपूरमध्ये झाला होता. यामी गौतमने चंदिगडमधील यादविंद्र पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. शालेय शिक्षणानंतर तिने पंजाब विद्यापीठात प्रवेश घेतला. काही रिपोर्टसनुसार, यामीला कॉलेजमध्ये शिकत असताना आयएएस अधिकारी व्हायचे होते. ती ऑनर्सचे शिक्षण घेत होती.

यामी अभिनय क्षेत्राकडे कशी वळली?

यामीने एका मुलाखतीत तिची अभिनय क्षेत्रातील करिअरला कशी सुरुवात झाली याबद्दल सांगितले होते. यामी म्हणालेली, “तिच्या घरी काही पाहुणे आले होते. यामीच्या वडिलांच्या मित्राची पत्नी अभिनेत्री होती. त्यांना वाटले की, यामी अभिनय क्षेत्रात काम करू शकते. त्यानंतर यामीचे काही फोटो मुंबईतील अनेक प्रॉडक्शन हाऊसना पाठवले गेले.

वयाच्या २० व्या वर्षी यामी गौतम चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी चंदिगडहून मुंबईला आली. त्यासाठी तिने तिचे शिक्षण अर्ध्यावरच सोडले. यामीने मॉडेलिंगपासून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिने अभिनेता आयुष्मान खुरानाबरोबर ‘विकी डोनर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याशिवाय यामीने तेलुगू, मल्याळम व कन्नड या भाषांतील चित्रपटांमध्येही काम केले आहे.

यामी हक या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हक या चित्रपटात इमरान हाश्मी प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात यामीबरोबर काम करण्याचा अनुभव सांगाताना इमरान हाश्मीने तिचे कौतुक केले. तो म्हणाला की, ती काही मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी वेळेवर शूटिंगसाठी येते आणि त्यामुळे तिच्याबरोबर काम करताना कोणतीही अडचण आली नाही.

दरम्यान, हक हा चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.