Amitabh Bachchan called Jaya Bachchan embarrassingly straight: अमिताभ बच्चन व जया बच्चन हे बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सातत्याने चर्चेत राहणारे जोडपे आहे. जया बच्चन अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात, तर अमिताभ बच्चन ब्लॉगच्या माध्यमातून त्यांचे विचार चाहत्यांपर्यंत पोहोचवतात.
जया व अमिताभ बच्चन यांच्या लग्नाला ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘गुड्डी’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती. पहिल्या भेटीतच अमिताभ बच्चन यांचा जया बच्चन यांच्यावर प्रभाव पडला होता. मात्र, अमिताभ बच्चन १९७२ साली प्रदर्शित झालेल्या नजर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जया यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर १९७३ साली त्यांनी लग्नगाठ बांधली.
अमिताभ बच्चन काय म्हणालेले?
एका जुन्या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीविषयी जया बच्चन म्हणालेल्या, “माझी आणि त्यांची भेट गुड्डी या सिनेमाच्या सेटवर झाली. मी प्रभावित झाले होते. ते लेखक हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा असल्याने त्यांचा प्रभाव पडला होता. त्यानंतर मी त्यांच्या प्रेमात पडले.
आता अमिताभ बच्चन यांचे एक जुने वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बिग बींनी जया बच्चन यांच्याविषयी वक्तव्य केले होते. अमिताभ बच्चन यांनी स्टारडस्ट मासिकाला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी लग्नाबाबत वक्तव्य केले होते. ते दोघेही चित्रपट क्षेत्रातील असल्याने आणि अभिनेते असल्याने त्यांना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत झाली, असे त्यांनी म्हटले आहे. जया बच्चन यांच्याशी लग्न झाल्याने त्यांनी स्वत:ला भाग्यवान म्हटले होते.
अमिताभ बच्चन म्हणालेले, “जया माझ्यासारखी नाही, ती खूप उत्साही, उत्स्फूर्त अशी आहे. मी ज्या क्षेत्रात काम करतो, त्याच क्षेत्रात ती काम करत असल्याने तिला गोष्टी समजतात. यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. चित्रपटसृष्टीत गोष्टी कशा पद्धतीने चालतात, याबद्दल तिला माहीत आहे. ती माझ्या आयुष्यात असणे हे माझ्यासाठी वरदान आहे.”
“जर माझ्या क्षेत्रात काम न करणाऱ्या महिलेशी मी लग्न केले नसते तर काय झाले असते हे मला माहीत नाही. असं म्हणतात की, इंडस्ट्रीमधील लग्न टिकत नाहीत. पण, लोक मला या श्रेणीत ठेऊ शकत नाहीत.”
जया बच्चन यांच्याविषयी अमिताभ बच्चन असेही म्हणालेले, “कोणत्याही लग्नात चढ-उतार येतात. दोन माणसांमध्ये मतभेद होतात. जया स्पष्टवक्ती आहे, ती मनात कोणतीही गोष्ट ठेवत नाही. अनेकदा ती अति स्पष्टवक्ती वाटते, पण मी कधीही तिच्यातील हा गुण बदलण्याचा प्रयत्न केला नाही.”
“मीदेखील अनेकदा स्वत:मध्ये गुंतलेला असतो. हे माझे स्वभाववैशिष्ट्य आहे. पण, तिने मला कधीही बदलण्याचा प्रयत्न केला नाही. जेव्हा मला एकटे राहायचे असते, तेव्हा ती मला एकट्याला राहू देते. असेच नाते माझ्या पालकांचेदेखील होते”, असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी त्यांचे मत व्यक्त केले होते.
दरम्यान अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या ब्लॉगमधून व्यक्त होताना दिसतात. आगामी काळात ते कोणत्या चित्रपटात दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.