Madhuri Dixit : बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. दोघांचा लग्नसोहळा अमेरिकेत पार पडला होता. करिअरच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नानंतर माधुरी पतीसह अमेरिकेत स्थायिक झाली. बॉलीवूडचं कलाविश्व सोडून सामान्य लोकांप्रमाणे आयुष्य जगत आपलं घर-संसार सांभाळायचा निर्णय अभिनेत्रीने घेतला होता.

माधुरीने लग्नानंतर अमेरिकेत गेल्यावर तिची संपूर्ण दिनचर्या बदलली होती. अभिनेत्रीचे पती डॉ. नेने हे तेव्हा हार्टसर्जन म्हणून कार्यरत होते. त्यामुळे नेने कामावर जाण्याआधी त्यांच्यासाठी नाश्ता बनवण्यासाठी अभिनेत्री पहाटे साडेपाच वाजता उठायची. याशिवाय जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी तिने रेसिपीबूक देखील विकत घेतलं होतं. सिमी गरेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत माधुरीने याबद्दल खुलासा केला होता.

माधुरी यामध्ये सांगते, “मी पहाटे ५:३० वाजता उठायचे, नाश्ता बनवायचे. मग काही वेळाने पुन्हा घरातील इतर कामं सुरू व्हायची. स्वयंपाक करताना सुरुवातीला अनेकदा गोंधळ व्हायचा. पण, माझ्या नवऱ्याने कधीच कोणतीही तक्रार केली नाही.”

माधुरी दीक्षितने यावेळी कोळंबी मसाला हा पदार्थ बनवताना घडलेला एक मजेशीर किस्सा सर्वांना सांगितला. अभिनेत्री म्हणाली, “अमेरिकेत प्री-कूक कोळंबी मिळते… म्हणजे ती आधीच शिजवलेली असते. ही गोष्ट तेव्हा मला खरंच माहिती नव्हती. मी एकदा कोळंबी मसाला बनवायचं असं ठरवलं. मसाला शिजल्यावर मी त्या ग्रेव्हीमध्ये कोळंबी घातली, ही रेसिपी मी पुस्तकात सुद्धा नीट वाचली होती. पण, नेमकं उलटंच घडलं.”

“अमेरिकेत प्री-कूक कोळंबी मिळत असल्याने हा सगळा गोंधळ झाला होता. कोळंबी जास्त शिजली आणि ती पूर्ण रबरासारखी झाली होती. त्यामुळे डॉ. नेने जेवताना ती कोळंबी नीट गिळूही शकत नव्हते…ओव्हरकूक होऊन ती सगळी कोळंबी रबरासारखी झाली होती. पण, माझा नवरा शेवटपर्यंत काहीच बोलला नाही, त्याने हसतमुखाने सगळं खाल्लं… अशाप्रकारे माझी फजिती झाली होती.” असं माधुरी दीक्षितने सांगितलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, माधुरी व तिचे पती डॉ. नेने लग्नानंतर काही वर्षे अमेरिकेत राहिले आणि त्यानंतर २०११ संपूर्ण कुटुंबासह हे दोघंही भारतात परतले. आता अभिनेत्री पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये सक्रिय झाली आहे. लवकरच ती ‘मिसेस देशपांडे’ या सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमात झळकणार आहे.