When Rekha’s Father Said She Messed Up Her Life By Getting Involved With Amitabh Bachcha : रेखा आणि अमिताभ बच्चन यांची प्रेमकहाणी ९०च्या काळात प्रचंड गाजली होती. आजही याबद्दल अनेकदा बोललं जातं. रेखा यांचे अमिताभ यांच्याबरोबर विवाहबाह्य संबंध होते अशा चर्चा आजही केल्या जातात. लोकांमध्ये रेखा व अमिताभ यांच्या नात्याबद्दल इतकी चर्चा असताना काही वर्षांपूर्वी रेखा यांच्या वडिलांनी याबद्दल त्यांची प्रतिक्रिया दिलेली.

रेखा यांचे वडील जेमिनी गणेशन हे लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी त्यांची लेक रेखा व अमिताभ यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांवर काही वर्षांपूर्वी प्रतिक्रिया दिलेली. ‘ओल्ड स्टार अँड स्टाइल’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत सांगितलेलं. लेकीच्या खासगी आयुष्याबद्दल ते म्हणालेले, “लोक मला सांगतात की रेखाने अमिताभबरोबर संबंध ठेवून तिचं खासगी आयुष्य उद्धवस्त केलं. पण, मी कधीच तिच्याशी तिच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा केली नाही आणि मी का करावी?”

रेखा यांचे वडील पुढे म्हणालेले, “जेव्हा मी काही वर्षांपूर्वी सावित्री आणि पुष्पवलीशी लग्न केलं, तेव्हा खूपच खळबळ उडाली आणि तो इंडस्ट्रीतील सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला. पण, आज मात्र दिलीप कुमारने अस्माशी लग्न केल्याचं किंवा धर्मेंद्रने हेमाशी लग्न केल्याचं ऐकून कोणालाच आश्चर्य वाटत नाही, त्यामुळे एका अर्थाने मीच या इंडस्ट्रीत विवाहबाह्य संबंधांचा ट्रेंडसेटर ठरलो आहे.”

अभिनेत्री रेखा यांचा जन्म १९५४ रोजी झाला होता. त्या जेमिनी गणेशन व पुष्पावल्ली यांच्या मुलगी आहेत. ‘एनडी टीव्ही’च्या वृत्तानुसार रेखा यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा माध्यमांचं लक्ष वेधून घेतलं. अभिनेत्यांपासून ते चित्रपट निर्मात्यांपर्यंत अनेकांशी त्यांचं नाव जोडलं गेलं, तसेच १९९० मध्ये व्यावसायिक मुकेश अग्रवालसोबतचं त्यांचं काहीकाळ टिकलेलं लग्नही चर्चेत आलं. त्या लग्नाचा शेवट अत्यंत दुर्दैवी ठरला, कारण काही महिन्यांतच मुकेश यांनी आत्महत्या केली.

अमिताभ बच्चन यांनी १९७३ मध्ये जया भादुरींसह लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला ५० वर्षे होऊन गेली असून त्यांना अभिषेक बच्चन व श्वेता बच्चन अशी दोन मुलही आहेत. रेखा व अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी ‘दो अंजाने’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘सुहाग’, ‘मुकद्दर का सिकंदर’ आणि ‘सिलसिला’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे.