कुस्तीपटू आणि अभिनेता दारा सिंग हे रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मधील हनुमानाच्या भूमिकेसाठी प्रचंड लोकप्रिय होते. २०१२ मध्ये वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. दिवंगत अभिनेत्याचा मुलगा विंदू दारा सिंग याने अलीकडेच त्यावेळचा एक किस्सा शेअर केला. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर विंदू आणि त्याच्या घरच्यांनी शॅम्पेन पिऊन त्यांचे जीवन साजरा केले होते अन् नेमके त्यावेळी त्यांच्या घरी अमिताभ बच्चन आले. हाच किस्सा विंदू यांनी शेअर केला आहे.

यूट्यूबर सिद्धार्थ कन्नन संवाद साधताना विंदू दारा सिंह म्हणाला, “माझ्या वडिलांनी सांगितले होते, ‘जेव्हा मी हे जग सोडून जाईन, तेव्हा त्या दिवशी मी जेवढं जगलो त्याचं सेलिब्रेशन कर, रडू नकोस.’ ज्या दिवशी वडिलांचे निधन झाले तेव्हा रात्री आमचे संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होते, तेंव्हा मला बाबांनी सांगितलेली गोष्ट आठवली, त्यामुळे सर्वांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही शॅम्पेनची बाटली उघडून पिण्यास सुरुवात केली अन् पार्टी करू लागलो, सगळेच यावेळी वडिलांची आठवण काढत होते.”

आणखी वाचा : मामूट्टी यांचा बहुचर्चित ‘ब्रमयुगम’ अखेर येणार ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहायला मिळणार?

जेव्हा विंदू आणि त्याचे कुटुंबीय हे सेलिब्रेशन करत होते तेव्हा नेमके अमिताभ बच्चन त्यांच्या घरी आले. त्या घटनेबदल बोलताना विंदू म्हणाला, “त्यावेळी दरवाजाची बेल वाजली अन् दार उघडले तर खुद्द बच्चन साहेब तिथे होते. त्यादिवशी अमिताभ बच्चन त्यांच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने ते रात्री आम्हा कुटुंबियांना भेटायला आले होते. आमच्या हातात शॅम्पेनचे ग्लास पाहून त्यांनी मला विचारले की नेमकं काय सुरू आहे? त्यावेळी मी सांगितलं की बाबांनी सांगितलं होतं की ते जेव्हा या जगातून जातील तेव्हा त्यांचे जीवन साजरे करा, त्यामुळे आम्ही तेच करत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे विंदू म्हणाला, “त्यांनी त्यावर मला काहीच उत्तर दिलं नाही अन् थेट ते माझ्या आईला भेटायला गेले अन् तिच्याशी बोलू लागले. पण आमच्या हातातले ग्लास आणि एकूणच तिथलं वातावरण पाहून ते चांगलेच आश्चर्यचकित झाले होते हे त्यांच्या चेहेऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.” २०१२ मध्ये जेव्हा दारा सिंह यांचे निधन झाले तेव्हा अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांनी ट्वीट करत त्यांचे दुःख व्यक्त केले होते.